फ्रिडोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश सोनवणे यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की त्यांना आणि अथरचे सहसंस्थापक स्वप्नील जैन यांना ड्रेस कोडवरून बेंगळुरूमधील एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. धोतर परिधान करून केलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याला जीटी मॉलमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. शेतकऱ्याच्या मुलाने ही घटना कॅमेऱ्यात कैद करून सरकारला कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर कर्नाटक सरकारने मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी जीटी मॉल सात दिवसांसाठी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर फ्रिडोच्या संस्थापकांनी आपलाही असा अनुभव शेअर केला आहे.
त्यांनी एक्सवर म्हटले आहे की, ही सत्य कथा आहे, स्वप्नील, अथरचे सहसंस्थापक आणि मी एकदा बेंगळुरूमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि शूजऐवजी चप्पल घातल्यामुळे आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला होता."
सोनवणे यांनी ही घटना केव्हा आणि कुठे घडली हे सांगितले नसले, तरी यावेळी मूर्खपणा वाटल्याची कबुली दिली आहे. मात्र आपण या घटनेकडे भेदभाव म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवेश नाकारल्यानंतर ते दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते.
शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारने मॉल सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात फकीरप्पा नावाच्या ७० वर्षीय शेतकऱ्याला मुलगा नागराजसोबत चित्रपट पाहण्यासाठी वैध तिकीट असूनही मॉलमध्ये प्रवेश दिला गेला नाही. तेथे उपस्थित सुरक्षारक्षकाकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की, मॉलमध्ये धोतर घालणाऱ्यांना प्रवेश बंदी आहे.
हा मुद्दा कर्नाटक विधानसभा अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. कर्नाटकचे शहर विकास मंत्री बिरथी सुरेश यांनी मॉल व्यवस्थापनाविरोधात कडक कारवाई करत मॉल सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेला दिले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक शेतकरी संघटनांनी मॉलच्या बाहेर आंदोलन करत मॉल व्यवस्थापनाने शेतकऱ्याची माफी मागावी अशी मागणी केली. अभिनेत्री आणि मॉडल गौहर खान हिनेही इंस्टाग्रामवर या घटनेचा निषेध केला. तिने लिहिले की, ही घटना लाजीरवाणी आहे. मॉलविरोधात कडक कारवाई केली पाहिजे. हा भारत आहे व आम्हाला आपल्या संस्कृतीचा अभिमान असायला हवा. महापालिकेने या घटनेत सामील कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे
संबंधित बातम्या