Rameshwaram cafe blast : बेंगळुरू हादरले! प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये IED स्फोट, ९ जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rameshwaram cafe blast : बेंगळुरू हादरले! प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये IED स्फोट, ९ जखमी

Rameshwaram cafe blast : बेंगळुरू हादरले! प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये IED स्फोट, ९ जखमी

Mar 01, 2024 07:06 PM IST

Bengaluru Blast news : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील 'रामेश्वरम' कॅफेमध्ये (Rameshwaram cafe) आज बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ९ जण जखमी झाले आहेत.

बेंगळुरू हादरले! रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात ९ जखमी
बेंगळुरू हादरले! रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात ९ जखमी (REUTERS)

Bengaluru Blast News : बेंगळुरूतील व्हाइटफिल्ड भागातील रामेश्वरम कॅफेमध्ये (Rameshwaram Cafe) शुक्रवारी झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (siddaramaiah) यांनी या घटनेस दुजोरा दिला असून स्फोट घडवून आणण्यासाठी कमी तीव्रतेच्या स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

दुपारच्या जेवणाच्या वेळेत आजूबाजूच्या कार्यालयांमधून कॅफेमध्ये गर्दी जमली असताना ही घटना घडली. शहराच्या पूर्वेला असलेले हे आउटलेट टेक्नॉलॉजी हबमधील प्रसिद्ध भोजनालय आहे.

कॅफेच्या सहसंस्थापक यांनी स्फोटाबद्दल माहिती दिली. '१० सेकंदाच्या कालावधीत दोन स्फोट झाले. हे स्फोट वॉश बेसिनच्या भागात झाले. एका बॅगेत काही वस्तू ठेवल्या होत्या. त्यातून हे स्फोट झाले, असं राव यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. कोणाच्याही जिवाला धोका नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचं लोकप्रिय ठिकाण

 

> रामेश्वरम कॅफे ही दक्षिण भारतातील क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटची साखळी आहे. मेसर्स अल्ट्रान व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत हे कॅफे कार्यरत आहेत.

> स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोर पालन, उत्तम चवीचे गरमागरम दक्षिण भारतीय पदार्थ आणि अत्यंत वेगवान सेवा ही रामेश्वरम कॅफेची ओळख आहे. ब्रँडची आउटलेट्स सकाळी ६.३० ते रात्री १ वाजेपर्यंत सुरू असतात.

> रामेश्वरम कॅफेची साखळी राघवेंद्र राव आणि त्यांची पत्नी दिव्या राव यांनी २०२१ मध्ये सुरू झाली. यातील पहिली दोन आउटलेट्स बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली होती.

> माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून कॅफेचं नाव 'रामेश्वरम' असं ठेवण्यात आलं आहे. रामेश्वरम हे अब्दुल कलाम यांचं जन्मस्थळ आहे.

> मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेले आणि अन्नपदार्थांच्या व्यवसायात २० वर्षांहून अधिक अनुभव असलेले राघवेंद्र राव हे ब्रँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दिव्या राव या आयआयएम अहमदाबादमधून फायनान्स अँड मॅनेजमेंटमध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्या रामेश्वरम कॅफेच्या मॅनेजमेंट आणि फायनान्स विभागाच्या प्रमुख आहेत.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर