अजानच्या वेळेतच स्पीकरवर जोरजोरात हनुमान चालीसा वाजवतो म्हणून एका मोबाइल फोन विक्रेत्या दुकानदाराला तरुणांच्या एका टोळक्याने मारहाण केल्याची घटना बेंगळुरू शहरात घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये दुकानदार आणि तरुणांच्या टोळक्यात आधी शाब्दिक बाचाबाची आणि नंतर हाणामारी होत असल्याचे दिसून येत आहे. बेंगळुरुत सिद्धन्ना लेआऊटजवळ काल, रविवारी हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बेंगळुरूच्या हलासुरु गेट पोलिस हद्दीत या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत भाजपने प्रतिक्रिया व्यक्त करत कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटकात हनुमान चालीसावर बंदी आहे का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती देताना दुकानदार मुकेश याने सांगितले की मी दुकानात स्पीकरवर हनुमान चालीसा लावले होते. दरम्यान, दुकानात ४-५ तरुण माझ्याकडे आले. अजानची वेळ आली असल्याने हनुमान चालीसा लावू नको, असं म्हणाले. बाचाबाची झाल्यानंतर त्या तरुणांनी मारहाण केली. एका तरुणाने चाकूचा धाक दाखवला.' असा आरोप दुकानदाराने केला आहे.
दरम्यान, या मारहाण प्रकरणी आरोपी सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश, तरुण आणि एका अज्ञात अशा एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बेंगळुरू पोलिस उपायुक्तांनी एएनआयला दिली. सहा आरोपीपैकी सुलेमान, शाहनवाज आणि रोहित या तिघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
संबंधित बातम्या