viral news : धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारला प्रवेश; व्हिडिओ व्हायरल होताच मॉलला टाळं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral news : धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारला प्रवेश; व्हिडिओ व्हायरल होताच मॉलला टाळं

viral news : धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारला प्रवेश; व्हिडिओ व्हायरल होताच मॉलला टाळं

Updated Jul 18, 2024 05:55 PM IST

Viral News : सोशल मीडियावर बेंगळुरुमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये एका वृद्ध शेतकऱ्याला त्यांच्या वेशभूषेवरून मॉलच्या आतमध्ये जाताना अडवले.

धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला
धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला

बेंगळुरुमधील प्रसिद्ध जीटी मॉलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये धोतर परिधान केलेल्या एका शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश दिला नाही. या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला. शेतकरी संघटनांनी आंदोलन करत मॉल व्यवस्थापनाविरोधात कडक कारवाईची मागणी केली. त्यानंतर आता कर्नाटकमधील सिद्दारमय्या सरकारने कारवाई केली असून जीटी मॉल सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सोशल मीडियावर बेंगळुरुमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये एका वृद्ध शेतकऱ्याला त्यांच्या वेशभूषेवरून मॉलच्या आतमध्ये जाऊ दिले नाही. हा शेतकरी आपल्या मुलासोबत मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्या घटनेनंतर शेतकरी व त्याच्या मुलाने एक व्हिडिओ बनवून मॉलच्या सुरक्षा रक्षक व व्यवस्थापनाविरुद्ध गंभीर आरोप केले होते. शेतकरी व त्यांचा मुलगा सांगत आहेत की, कपड्यांमुळे त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारला गेला.

हा मुद्दा कर्नाटक विधानसभा अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. कर्नाटकचे शहर विकास मंत्री बिरथी सुरेश यांनी मॉल व्यवस्थापनाविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. विधानसभेत बोलताना सुरेश यांनी म्हटले की, कायद्यानुसार सरकार मॉल सात दिवस बंद ठेवणार आहे. मी बेंगळूरु महानगर पालिकेच्या (बीबीएमपी) अधिकाऱ्यांना या घटनेबाबत मॉलविरोधात कारवाई करताना मॉल सात दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सुरेश यांच्या घोषणेनंतर सभापतींनी या कारवाईचे स्वागत केले.

व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ -
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, फकीरप्पा नावाच्या ७० वर्षीय शेतकरी व त्यांचा मुलगा नागराज यांना तिकीट असूनही मॉलमध्ये प्रवेश दिला नाही. याबाबत सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, धोतर परिधान केलेले लोक मॉलच्या नियमानुसार प्रवेश करू शकत नाही. नागराजने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मॉलवर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली होती.

 

शेतकरी संघटनांनी मॉलबाहेर केली निर्देशने –

या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक शेतकरी संघटनांनी मॉलच्या बाहेर आंदोलन करत मॉल व्यवस्थापनाने शेतकऱ्याची माफी मागावी अशी मागणी केली. अभिनेत्री आणि मॉडल गौहर खान हिनेही इंस्टाग्रामवर या घटनेचा निषेध केला. तिने लिहिले की, ही घटना लाजीरवाणी आहे. मॉलविरोधात कडक कारवाई केली पाहिजे. हा भारत आहे व आम्हाला आपल्या संस्कृतीचा अभिमान असायला हवा. महापालिकेने या घटनेत सामील कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर