Bengaluru Murder : महिलेच्या शरीराचे ५० तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या संशयिताची आत्महत्या-bengaluru fridge horror mahalakshmi murder suspect dies by suicide in odisha ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bengaluru Murder : महिलेच्या शरीराचे ५० तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या संशयिताची आत्महत्या

Bengaluru Murder : महिलेच्या शरीराचे ५० तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या संशयिताची आत्महत्या

Sep 25, 2024 11:19 PM IST

Mahalakshmi murder Case : २९ वर्षीय महालक्ष्मी बेंगळुरूच्या सांपीगे रोडवरील मंत्री मॉलमध्ये कामाला होती. या महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून भाड्याच्या घरात फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य संशयिताने आत्महत्या केली आहे.

मृत महालक्ष्मी
मृत महालक्ष्मी

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील महालक्ष्मी हत्याकांडाचे गूढ अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. या प्रकरणातील आरोपी मुक्तिरंजन प्रताप रॉय याने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह ओडिशात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मध्य-बेंगळुरूचे डीसीपी शेखर एच. टेकण्णावर यांनी ही माहिती दिली आहे. बेंगळुरूच्या मल्लेश्वरम भागातील एका इमारतीत मुक्तिरंजनने महालक्ष्मीची हत्या करून मृतदेहाचे ५० तुकडे केल्याचा आरोप आहे. शनिवारी महालक्ष्मीची आई आणि बहीण त्यांच्या घरी पोहोचल्यावर हा प्रकार उघडकीस आला होता.

बेंगळुरू येथील राहत्या घरी रेफ्रिजरेटरमध्ये महालक्ष्मी (२९) या तरुणीची निर्घृण हत्या झाली होती. दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले की, संशयित ओडिशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याला पकडण्यासाठी अनेक पथके रवाना करण्यात आली होती.

महालक्ष्मीची निर्घृण हत्या करणारा मुक्तिरंजन वेगवेगळ्या ठिकाणांहून ओडिशात पोहोचल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून बेंगळुरू पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी ओडिशाला गेले होते, मात्र पोलिसांना त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात त्याने महालक्ष्मीची हत्या केल्याची कबुलीही दिली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके ओडिशाला पाठवली होती.

२९ वर्षीय महालक्ष्मी बेंगळुरूच्या सांपीगे रोडवरील मंत्री मॉलमध्ये कामाला होती. या महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून व्यालिकवाल परिसरातील विनायकनगर येथील भाड्याच्या घरात फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्या रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, मृत महिलेच्या पतीने महालक्ष्मीच्या मित्रावर हत्येचा आरोप केला होता. या प्रकरणात आरोपी म्हणून अशरफ नावाच्या व्यक्तीचीही पोलिस चौकशी करत आहेत.

नेपाळची रहिवासी असलेली महालक्ष्मी गेल्या नऊ महिन्यांपासून बेंगळुरूमध्ये रहात होती. ती पतीपासून वेगळी राहत होती. सोमवारी राज्याचे गृहमंत्री परमेश्वर यांनी सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी मूळचा ओडिशाचा असून त्याची ओळख पटली आहे. ओडिशा-बंगाल सीमेवर पोलिसांना त्याचा ठावठिकाणा सापडला असून या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक आरोपी मुक्तिरंजनला पकडण्यासाठी ओडिशाला गेले होते.

शनिवारी सापडलेल्या महालक्ष्मीच्या हत्येने शहर हादरले असून, २०२२ मध्ये दिल्लीतील कुख्यात श्रद्धा वालकर प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाचेही तुकडे करून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. 

Whats_app_banner