Bengaluru boy dies After Eating Cake: बंगळुरूमधील भुवनेश्वरी नगर भागातील केपी अग्रहारा येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर, त्याच्या आई- वडिलांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली.
बलराज आणि नागलक्ष्मी असे या आयसीयूमध्ये उपचार सुरू असलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. बलराज हा स्विगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. रविवारी, 6 ऑक्टोबर रोजी एका ग्राहकाने केकची ऑर्डर रद्द केली होती, त्यानंतर तो केक त्याच्या घरी घेऊन आला. तर, मात्र, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, बलराजने त्याचा मुलगा धीरजच्या वाढदिवसानिमित्त स्विगीवरून केक ऑर्डर केला होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर बलराज, नागलक्ष्मी आणि धीरज रविवारी रात्री झोपायला गेले. मात्र, सोमवारी सकाळी उठल्यानंतर तिघांच्याही पोटात दुखू लागल्याने त्यांना शेजाऱ्यांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केली. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी धीरजला मृत घोषित केले.
बलराज आणि नागलक्ष्मी बेशुद्ध अवस्थेत आहेत. ते शुद्दीत आल्यानंतर सत्य समोर समजेल. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आहे. तर, हे प्रकरण आत्महत्येचाही असू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. केक फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला.
या घटनेवर स्वीगीने एक निवेदन जारी केले. बंगळुरूमध्ये घडलेल्या घटनेने आम्ही दु:खी आहोत. आमच्या संवेदना कुटुंबासोबत आहेत. पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आमची टीम हॉस्पिटलमध्ये गेली. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासात आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. अन्न सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर फक्त तेच रेस्टॉरंट समाविष्ट करतो, ज्यांच्याकडे एफएसएसएआय परवाना आहे.