Bengaluru Airport Murder Case : देशात सर्वाधिक सुरक्षा ही विमानतळावर असते. या ठिकाणी सुरक्षा दलाचे विविध कर्मचारी तैनात असतात. मात्र, असे असतांना देखील बंगळुरू विमानताळवर एक खळबळजनक घटना घडली आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांना चुकवून केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आत कुऱ्हाड नेऊन एकाने एका व्यक्तीची हत्या केली. खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
रामकृष्ण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो विमानतळावर ट्रॉली ऑपरेटर म्हणून काम करतो. तर रमेश बेग असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने विमानताळावर धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी ७ वाजता घडली.
आरोपी रमेशने त्याच्या बॅगेत कुऱ्हाड लपवून आणला होता. रमेश हा विमानतळावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसमध्ये बसला. बसमधून विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत नसल्याचं त्याला माहिती होत. विमानतळावर पोहचल्यानंतर रमेश हा रामकृष्णची बराच वेळ वाट पाहत होता. रामकृष्ण बाहेर आल्यानंतर रमेशने बॅगेतून कुऱ्हाड काढून रामकृष्णवर वर सपासपवार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पसरला होता. ही घटना विमानतळावरील टर्मिनल १ च्या पार्किंग लॉटमध्ये घडली. ईशान्य बंगळुरूचे पोलीस उपअधीक्षक म्हणाले, रमेश बेगला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळ कुऱ्हाड सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे. रमेश हा बीएमटीसी बसमधून विमानतळावर आला. बसमध्ये असल्यामुळे त्याची तपासणी (स्कॅनिंग) झाली नाही. त्यामुळे तो विमानतळावर शस्त्र घेऊन पोहोचू शकला. रामकृष्ण टर्मिनल १ च्या लेन १ वरील पार्किंगजवळ असल्याची माहिती त्याला मिळाली. यावेळी त्याने तिथे जाऊन रामकृष्णची हत्या केली.
आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली. त्याच्या पत्नीचे व खून झालेल्या रामकृष्णचे अनैतिक संबंध होते. याच रागातून त्याने रामकृष्णची हत्या केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.