बांगलादेशात पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा देऊन भारतात शरण घेतल्यानंतर भारत-बांगलादेश संबंध ताणले गेले आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातून दरवर्षी दुर्गा पूजेदरम्यान आयात करण्यात येणारा हिल्सा मासा भारतात येईल की नाही याची खात्री नव्हती. परंतु पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी विशेष परवानगी देत भारतात हिल्सा माशाचे ट्रक येण्यास सुरूवात झाली आहे. दुर्गा पूजेदरम्यान भारत एकूण २४२० टन हिल्सा मासा बांगलादेशातून आयात करणार असून ५० टनाची पहिली खेप नुकतीच कोलकता शहरात दाखल झाली आहे.
बंगाली संस्कृतीत हिल्सा माशाला एक अनन्यसाधारण असे स्थान आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजे दरम्यान हिल्सा जातीचा मासा खाणे शुभ मानले जाते. हिल्सा मासा हा त्याची वेगळी चव आणि रेशमी पोत यामुळे बहुमोल मानला जातो. या माशाची उत्पत्ती गोड्या पाण्यात होते. हिल्साला पश्चिम बंगाल राज्याचा ‘राज्य मासा’ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. हिल्सा हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा मानला जातो. बांगलादेशमध्ये जगातला ७० टक्के हिल्सा माशाची पैदास होते. त्यामुळे सणासुदीच्या वेळी हिल्सा माशाची प्रचंड मागणी होत असल्याने बांगलादेशवर निर्भर रहावे लागते. परंतु बांगलादेशात वर्षभर हिल्सा माशाची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. हिल्सा माशाची देशांतर्गत वाढती मागणी पाहता बांगलादेश सरकारने जुलै २०१२ मध्ये हिल्साच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परंतु २०१९ सालापासून बांगलादेश सरकार फक्त दुर्गा पूजेदरम्यान भारतात हिल्सा मासे निर्यात करण्याची विशेष परवानगी देत असते. त्याप्रमाणे यंदा २४२० टन हिल्सा माशांची बांगलादेशातून भारतात आयात केली जाणार आहे.
भारत आणि बांगलादेशमधून वाहणारी पद्मा नदी तसे पश्चिम बंगालमधील गंगा नदी आणि महा नदीमध्ये हिल्सा मासा आढळतो. पद्मा नदीत आढळणारा हिल्सा मासा केवळ पश्चिम बंगालमध्येच नव्हे तर नवी दिल्ली, झारखंड, बेंगलुरु आणि बिहारच्या बाजारात विक्री केली जाते.
पश्चिम बंगालमधील हावरा येथील होलसेल फिश मार्केटचे सचिव सय्यद अन्वर मक्सूद म्हणाले, ‘दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही बांगलादेशातील अंतरिम सरकारला दुर्गा पूजेदरम्यान हिल्सा मासे पाठवण्याची विनंती केली होती. तथापि त्यांच्या देशात असलेल्या काही अंतर्गत कारणांमुळे हिल्सा माशांच्या आयातीत थोडा उशीर झालाय. उशिरा का होईना हिल्सा मासे बाजारात उपलब्ध झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.’ यंदा ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा पूजा साजरी केली जाणार आहे.