उत्तर प्रदेशमधील बरेली येथे महिलांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला अखेर अटक करण्यात आली आहे. सीरियल किलरचे नाव कुलदीप असे आहे. बरेलीचे पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, आरोपीच्या मनात महिलांविषयी प्रचंड चीड आहे. तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्यानंतर त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. महिलांनी नकार देताच त्यांची हत्या करत होता. हत्येचा पॅटर्न एक सारखाच होता. आरोपी साडीने गळा आवळून महिलांची हत्या करत होता. आरोपीने६ महिलांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहे.
बरेली जिल्ह्यातील शाही आणि शीशगड परिसरात गेल्या १४ महिन्यात ९ महिलांची हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हत्येचा पॅटर्न एकसारखाच होता. सर्व महिलांची साडीने गळा आवळून हत्या केली होती. सर्व मृतदेह शेतातून तसेच झाडाझुडपात आढळल्या होत्या. हत्या झालेल्या सर्व महिलांचे वय ४५ ते ५५ वर्षाच्या दरम्यान होते. हत्येची घटना बरेलीच्या एकाच परिसरात काही दिवसांपासून सतत सुरू होत्या. त्यामुळे पोलिसांनी सीरियल किलिंगचा संशय व्यक्त करत त्याच दिशेने तपास केला.
पोलिसांनी सांगितले की, महिलांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एक वॉर रूम तयार केली होती. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधील बातम्यांचे संकलन केले गेले. या मोहिमेला'ऑपरेशन तलाश'नाव दिले गेले होते. २२ पथके गठित करत २५ किलोमीटरच्या परिसरातील जवळपास १५००CCTVचे फुटेज तपासले गेले. त्याचबरोबर ६०० नवीन सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले. महाराष्ट्रात सीरियल किलर बाबत एक अध्ययन केले गेले. दीड लाख मोबाइल नंबर्सचा डेटा तपासण्यात आला. बॉडी बॉर्न कॅमरे,गुप्त कॅमेरे लावून पोलिसांना तैनात करण्यात आले.
आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी ३ दिवसापूर्वीच ३ संशयितांचेस्केच जारी केले होते. यामध्ये एक स्केच कुलदीपचेही होते. मर्डर पॅटर्नबाबत क्लीनिकल सायकोलॉजी एक्सपर्टचा सल्ला घेण्यात आला. यामाध्यमातून तपास पथकाला समजले की, शाही पोलीस ठाणे परिसर सायको किलरचा सेंटर पॉइंट आहे. येथून एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर आरोपीला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप गंगवार नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील बाकरगंज समुआ गावातील आहे. त्याचे वय जवळपास ४० वर्षे आहे. पोलीस चौकशीत समोर आले की, त्यांच्या चुकीच्या वर्तवणुकीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यानंतर त्याच्या मनात महिलांविषयी घृणा निर्माण झाली. तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचा. महिलांनी प्रतिकार केल्यावर त्यांची साडीने गळा आवळून हत्या करायचा.