बँकेच्या चुकीमुळं दुकानदाराच्या बचत खात्यात आले तब्बल ९९९ कोटी, पुढं जे घडलं ते धक्कादायक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बँकेच्या चुकीमुळं दुकानदाराच्या बचत खात्यात आले तब्बल ९९९ कोटी, पुढं जे घडलं ते धक्कादायक

बँकेच्या चुकीमुळं दुकानदाराच्या बचत खात्यात आले तब्बल ९९९ कोटी, पुढं जे घडलं ते धक्कादायक

Oct 10, 2024 12:03 PM IST

Bengaluru Bank news : बँकेच्या एका चुकीमुळं बेंगळुरूतील एका कॉफी शॉप मालकाच्या बचत खात्यावर अचानक तब्बल ९९९ कोटी रुपये जमा झाले. मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्या या चुकीची शिक्षा आता तो खातेदार भोगत आहे.

बँकेच्या एका चुकीमुळं दुकानदाराच्या खात्यात आले तब्बल ९९९ कोटी, पुढं काय झालं?
बँकेच्या एका चुकीमुळं दुकानदाराच्या खात्यात आले तब्बल ९९९ कोटी, पुढं काय झालं? ( AFP PHOTO)

Bengaluru Bank error News : बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये कॉफी शॉप चालवणारा एक गृहस्थ एका रात्रीत हजार कोटींचा मालक झाला आहे. कारण, सेंट्रल बँक ऑफ इंडियातील त्याच्या पत्नीच्या बचत खात्यावर तब्बल ९९९ कोटी रुपये जमा झाल्याचं समोर आलं आहे. बँकेच्या एका चुकीमुळं हा प्रकार घडला. मात्र, त्यानंतर जे घडलं ते जास्त धक्कादायक आहे.

‘मिंट’नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. प्रभाकर एस. असं या व्यक्तीचं नाव आहे. ही चूक असल्यामुळं ते पैसे पुन्हा डेबिट होतील असं प्रभाकरला वाटत होतं. मात्र, पुढं भलताच प्रकार घडला. अवघ्या ४८ तासांच्या आत त्याचं खातं गोठविण्यात आलं आणि ते पैसे गायब झाले. मात्र त्यानंतरही खाते खुले केलं न गेल्यानं आता प्रभाकरला छोटे-छोटे व्यवहार करणंही कठीण झालं आहे.

माझा पोटापाण्याचा व्यवसायच ठप्प झालाय!

मला आता साधे ट्रान्झॅक्शनही करता येत नाहीएत. माझा धंदा करू शकत नाही. खातं पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करूनही बँक सहकार्य करत नसल्याचं प्रभाकर म्हणतो. तो स्वत: बँकेत गेला, ईमेल पाठवले आणि उत्तरेही मागितली, पण बँक काही प्रतिसाद देत नाही. माझा छोटासा व्यवसाय असल्यामुळं रोजच्या रोज मला व्यवहार करावे लागतात. पण खातं गोठविण्यात आल्याणुळं पैसे देणं-घेणं कठीण झालं आहे, असं प्रभाकर म्हणतो. 

बँकेचे लोक मदत करण्याऐवजी तुमचं घर कुठं आहे? तू कुठं आहेस? अशी चौकशी करत आहेत. नेमकं काय झालं माहीत नाही. मला एवढेच माहीत आहे की मी आता कोणताही व्यवहार करू शकत नाही. मी पुन्हा कधी व्यवहार करू शकेन याची कोणतीही सूचना किंवा तारीखही त्यांनी दिलेली नाही. मी त्यांना म्हणालो, तुम्ही काहीही करा, पण माझं अकाऊंट सुरू करा. मला लोकांना पैसे द्यावे लागतात. पण त्यांना कशीचीही फिकीर नाही, अशी नाराजी प्रभाकरनं व्यक्त केली.

एक्सपर्ट्स काय म्हणतात…

तांत्रिक बिघाडामुळं ही मोठी चूक झाली असण्याची शक्यता आहे. याची सखोल चौकशी करणं आवश्यक आहे, असं आर्थिक क्षेत्रातील तज्ञांनी म्हटलं आहे. हा प्रश्न लवकर न सुटल्यास हे प्रकरण रिझर्व्ह बँकेकडं नेण्याचा सल्ला MyWealthGrowth.com सहसंस्थापक हर्षद चेतनवाला यांनी प्रभाकर यांना दिला आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर