Bangladesh violence : गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या बांगलादेशला आज अंतरिम सरकार मिळण्याची शक्यता आहे. नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस हे आज रात्री बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहेत. युनूस यांनी बुधवारी सर्वांना 'शांतता राखण्याचे' व हिंसाचारापासून दूर राहण्याचे' आवाहन केले. दुसरीकडे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात अधिकारी व्यस्त आहेत. शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर देशाच्या सुरक्षा विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी बुधवारी घोषणा केली की, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास अंतरिम सरकारचा शपथविधी होईल. ते म्हणाले की, सल्लागार समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश राहील. जनरल जमान म्हणाले की, युनूस यांना लष्कर सर्वतोपरी मदत करेल. मंगळवारी नजरकैदेतून सुटका झालेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांनी युनूस यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच राष्ट्र उभारणीसाठी 'राग' किंवा 'सूड' उगरण्या पेक्षा 'प्रेम आणि शांती' राहणे गरजेचे आहे.
युनूस यांनी विद्यार्थी चळवळीच्या समन्वयकांचे अभिनंदन केले ज्यांनी त्यांचे नाव सर्वोच्च पदासाठी पुढे केले. त्यांनी या विद्यार्थ्यांना 'शूर विद्यार्थी' संबोधले आहे. या विद्यार्थ्यांनी देशाचा दुसरा विजय दिवस शक्य करण्यात पुढाकार घेतल्याचे देखील युनूस म्हणाले. तसेच देशातील हिंसाचार थांबवा असें आवाहन देखील त्यांनी केले आहे. तसेच देशाच्या उभारणीसाठी सज्ज व्हा, असे देखील युनूस म्हणाले.
मंगळवारपर्यंत, हसीनाच्या अवामी लीग पक्षाच्या किमान २९ नेत्यांचे मृतदेह देशभरात सापडले आहेत. स्थानिक माध्यमांनी सांगितले की, जुलैमध्ये पहिल्यांदा आंदोलन सुरू झाल्यापासून जवळपास आतापर्यन्त ४६९ नागरिक हिंसाचारात ठार झाले आहेत. शेख हसीना सोमवारी लष्करी विमानातून बांगलादेशहून निघून दिल्लीजवळील हिंडन हवाई दलाच्या तळावर पोहोचल्या.
हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर लूटमार आणि अराजकतेच्या घटना घडल्याचे लष्करप्रमुखांनी मान्य केले, त्यानंतर युनूस यांनी देशवासीयांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना, नवनियुक्त पोलिस महानिरीक्षक मोहम्मद मोईन उल इस्लाम म्हणाले की, काही आंदोलकांनी लूटपाट केली आहे. त्यांच्यावर नियंत्रण मिळवन्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. दरम्यान, यावेळी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे देखील त्यांनी मान्य केले.
'द डेली स्टार' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार देशात हिंसाचार सुरूच आहे. यामुळे संरक्षण दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. बुधवारी रॅपिड ॲक्शन बटालियन (RAB) आणि ढाका मेट्रोपॉलिटन पोलिस (DMP) च्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 'एकेएम शाहिदुर रहमान यांची आरएबीचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर मोहम्मद मोईन उल हसन हे हबीबुर रहमान यांच्यानंतर ढाका महानगर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.