बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार आणि मंदिरांची तोडफोड करण्याच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. बांगलादेशात पुन्हा एकदा इस्कॉन मंदिरांना लक्ष्य करून जाळण्यात आले आहे. इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शनिवारी पहाटे ढाक्यातील इस्कॉन मंदिरांना आग लावण्यात आली. आगीमुळे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती जळून खाक झाली. इस्कॉनच्या एका केंद्रालाही लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. याचे आम्हाला खूप दु:ख आहे. रात्री दोन ते तीन च्या दरम्यान मंदिरांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. बांगलादेशातील इस्कॉन नामहाट सेंटरला आग लावण्यात आली, असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे. श्री लक्ष्मी नारायण यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. हे मंदिर ढाका येथे आहे.
दास यांनी सांगितले की, रात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान उपद्रवी लोकांनी राधा कृष्ण मंत्री, नामहाट संघाअंतर्गत असलेले मंदिर आणि महाभाग्य लक्ष्मी नारायण मंदिराला आग लावली. मंदिरातील टिनशेड काढून आधी पेट्रोल टाकून नंतर आग लावण्यात आली. इस्कॉनचे पाद्री चिन्मय दास यांना बांगलादेशात अटक झाल्यानंतर भारतात आधीच नाराजी आहे. पश्चिम बंगालमध्येही याला विरोध होत आहे. चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
इस्कॉनने यापूर्वी दावा केला होता की, बांगलादेशातील आपली अनेक केंद्रे आणि मंदिरे बळजबरीने बंद करण्यात आली आहेत. दास यांनी बांगलादेशातील इस्कॉनच्या पुजाऱ्यांना स्वत:च्या संरक्षणासाठी भगवे कपडे परिधान करणे सोडून देण्याचा सल्ला दिला होता. कपाळावर टिळक लावू नका आणि तुळशीची माळ लपवून ठेवा. संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी सरकारने काही पावले उचलावीत, असे आवाहन संसदेने केले आहे.
संबंधित बातम्या