बांगलादेशातील अराजकता थांबण्याचे चिन्हे दिसत नसून आता एका प्रसिद्ध टीव्ही पत्रकाराचा मृतदेह ढाका येथील तलावात आढळून आल्याने खळबळ माजली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मुलाने हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचे म्हटलं आहे. बांगलादेशातील न्यूज चॅनल गाझी टीव्हीची न्यूज एडिटर आणि अँकर साराह रहनुमाचा ( Sarah Rahanuma ) मृतदेह तलावातील पाण्यात तरंगताना आढळून आला.
बांगलादेशच्या गाझी टीव्ही या बंगाली भाषेतील उपग्रह आणि केबल टेलिव्हिजन चॅनेलच्या न्यूजरूम एडिटर सारा रहानुमा ढाक्यातील तलावात मृतावस्थेत आढळल्या. ३२ वर्षीय साराह एका खासगी वृत्तवाहिनीत काम करत होती. स्थानिक नागरिकांना तिचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला.
बुधवारी तिचा मृतदेह देशाच्या राजधानीतील हातीरझील तलावात तरंगताना आढळल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (डीएमसीएच) पोलिस चौकीचे प्रभारी निरीक्षक बच्चू मिया यांनी तिचा मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. स्थानिक नागरिकांना मृतदेह तलावातून बाहेर काढला आणि ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (डीएमसीएच) नेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत्यूपूर्वी साराने मंगळवारी रात्री फेसबुकवर एक मेसेज पोस्ट केली होती. त्यात लिहिले होते की, "तुझ्यासारखा मित्र मिळाल्याने बरं वाटलं. देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देईल. आशा आहे की, तुम्ही तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण कराल. मला माहित आहे की आम्ही एकत्र खूप प्लॅनिंग केले होते. माफ करा, मी आमची योजना पूर्ण करू शकत नाही. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर देव तुम्हाला आशीर्वाद देवो,' असं तिने लिहिलं आहे. याआधीच्या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं की, 'मृत्यूसारखं आयुष्य जगण्यापेक्षा मरणं चांगलं आहे.'
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे अमेरिकेतील पुत्र सजीब वाजेद यांनी हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आणखी एक क्रूर हल्ला असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी एक्सवर लिहिले की, ती ज्या चॅनेलमध्ये काम करत होती ती गोलम दस्तगीर गाझी यांच्या मालकीची सेक्युलर मीडिया हाऊस होती, ज्याला नुकतीच अटक करण्यात आली होती.
साराहचा पती सय्यद शुभ्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा कामावर गेली पण घरी परतलीच नाही. पहाटे तीन वाजता तिने तलावात उडी मारल्याची माहिती मिळाली. आम्हाला हे सांगण्यात आलं की तिने आत्महत्या केली आहे. साराहचा पती सय्यद शुभ्र यांनी दावा केली आहे की, त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. त्यांंनी सांगितले की, काही दिवसापूर्वी साराहने घटस्फोट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्यात औपचारिकरित्या घटस्फोट झाला नाही. दोघांनी घरच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. पोलिसांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल.