बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचा भडका उडाला असून देशातील हिंसाचार व जनतेचा वाढता रोष पाहून शेख हसीना यांनी आज पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला आहे. त्या देश सोडून गाझियाबादला आल्या असून तेथून त्या लंडनला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलक थेट बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचल्याने त्यांना देशाचं प्रमुखपद सोडावं लागलं आहे. भारताच्या शेजारील देशात घडत असलेल्या सर्व घटनांचे पडसाद भारतातही दिसून येत आहेत. भारत बांगलादेश सीमेवर अतिरिक्त सैन्य तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
बांगलादेशमधील कायदा आणि सूव्यवस्थेची स्थिती पाहता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. बांगलादेशमधील कायदा आणि सूव्यवस्था तेथील लष्कराच्या हातात गेली आहे. भारत आणि बांगलादेशची सीमा ४,०९६ किलोमीटरपर्यंत पसरली आहे. या संपूर्ण सीमेवरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
बांगलादेशमधील नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात आहे. रेल्वे गाड्यांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने १५ दिवसांपूर्वी कोलकाता-ढाका-कोलकाता मैत्री एक्सप्रेस तात्पुरती रद्द केली होती. ही रेल्वेसेवा अजून काही दिवस बंद असेल. त्याचबरोबर बांगलादेश सीमेनजिक धावणाऱ्या मालगाड्या व प्रवासी रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. भारतीय रेल्वेकडून जवळपास २०० हून अधिक रेल्वे फेऱ्या रद्द केल्याचं सांगितलं जात आहे.
बांगलादेशमधील अशांततेमुळे इंडिगो आणि एअर इंडियाने भारतातून बांगलादेशची राजधानी ढाका येथे जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोने ढाक्याहून भारतात जाणारे विमान मंगळवारसाठी रद्द केले आहे. सोमवारी सर्व उड्डाणे सुरू आहेत.
एअर इंडियानेही ढाक्याला जाणारी उड्डाणे तात्काळ रद्द केली आहेत. एअरलाइनने सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "बांगलादेशमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आम्ही ढाक्याला येणारी आणि येणारी आमची उड्डाणे तात्काळ रद्द केली आहेत.
आम्ही परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि आमच्या प्रवाशांना ढाक्यात ये-जा करण्यासाठी कन्फर्म बुकिंगसह मदत करत आहोत आणि रिशेड्यूलिंग आणि कॅन्सलेशन चार्जेसवर एकरकमी सूट देत आहोत. आमच्या ग्राहकांची आणि क्रूची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अधिक माहितीसाठी आमच्या 24/7 संपर्क केंद्रावर 011-6932933/ 011-69329999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर बांगलादेश राजकीय संकटात सापडला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अवामी लीगचे अध्यक्ष सी-१३० ट्रान्सपोर्ट विमानाने गाझियाबादच्या हिंडन एअर बेसवर उतरले. हे विमान भारतीय हवाई दलाच्या सी-१७ आणि सी-१३० जे सुपर हर्क्युलिस विमानांच्या हँगरजवळ उभे केले जाणार आहे. भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापासून ते हिंडन एअरबेसपर्यंत तिच्या विमानाच्या हालचालींवर भारतीय हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांनी लक्ष ठेवले होते.
महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आणि आंदोलकांनी ढाक्यातील त्यांच्या निवासस्थानी घुसखोरी केली. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी ढाक्यातील धानमंडी ३२ येथील बंगबंधू भवन, ज्याला बंगबंधु स्मारक संग्रहालय म्हणून ओळखले जाते, यासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना आग लावली.