Bangladesh Violence : सरकारी नोकऱ्यांतील आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनानं अखेर बांगलादेशमधील लोकनियुक्त सरकारचा बळी घेतला आहे. शेकडो लोकांचा जीव घेणाऱ्या या आंदोलनामुळं पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशाबाहेर पळ काढला आहे. हसीना यांनी घर सोडल्यानंतर आंदोलकांनी घरावर हल्ला केला असून घरातील मासे, चिकन आणि फर्निचरही पळवून नेलं आहे. या अराजकीय परिस्थितीचा फायदा उचलत लष्करानं सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
१९७१ च्या बांगलादेश युद्धातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरीत ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शेख हसीना सरकारनं घेतला होता. तिथंच या वादाची ठिणगी पडली. विद्यार्थी संघटनांनी या आरक्षणास विरोध करत हसीना यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकारनं केला. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली आणि १० हजारांहून अधिक लोकांचा जमाव पंतप्रधानांच्या घरासमोर आला.
परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहून शेख हसीना यांनी राजीनामा देत घर सोडलं. त्यानंतर आंदोलकांनी घराचा ताबा घेतला. तिथं तोडफोड केली. शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान यांच्या पुतळ्याचीही आंदोलकांनी तोडफोड केली. पंतप्रधान निवासाच्या आवारातही आंदोलकांनी तोडफोड केली. हसीना पळाल्याचं समजल्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक झाले. एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी ढाक्यात उभ्या असलेल्या टाकीवर काही आंदोलक नाचत होते व झेंडे फडकावत होते. आंदोलकांनी हसीना यांच्या निवासस्थानी घातलेल्या धिंगाण्याचे व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.
तरुणांचं आंदोलन आणि ते दडपण्यासाठी सरकारनं लागू केलेली संचारबंदी आणि इंटरनेट बंदीमुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला १० अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. सोमवारपासून तीन दिवस बँकांसह सरकारी आणि खासगी कार्यालये पुन्हा बंद करण्यात आली असून मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
बांगलादेशच्या लष्करी आणि राजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेशातील सध्याचा हिंसाचार आणि अशांततेमागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात आहे. आयएसआय नेहमीच बांगलादेश स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात होती आणि पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र होण्यास ज्यांचा विरोध होता त्या विचारांच्या संघटनाना सातत्यात चिथावणी देत होती.
बांगलादेशातील आंदोलन चिघळल्यानंतर शेख हसीना राजीनामा देऊन देशातून बाहेर पडल्या आहेत. त्रिपुरामार्गे त्या दिल्लीत पोहोचल्याचं वृत्त आहे. तिथून त्या लंडनला जाणार असल्याचं सांगितलं जातं.