Bangladesh PM Sheikh Hasina Resignation: प्रचंड हिंसाचार आणि अराजकता दरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अखेर त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. एका बांगलादेशी वृत्तपत्राने दिलेल्या वृतानुसार शेख हसीना लष्करी हेलिकॉप्टरने भारताकडे रवाना झाल्या आहेत. त्या भारतात आश्रय घेण्याची शक्यता आहे. याशिवाय बांग्लादेशची सूत्र आता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांगलादेशी मंत्र्याचा हवाला देत एएफपीने दावा केला आहे की शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. सध्या त्यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान सोडले असून बहिणीसह देशाबाहेर पडल्या आहेत. बांगलादेशचे कायदा मंत्री अनिसुल हक म्हणाले, देशातील परिस्थिती खूप वाईट झाली आहे. कधीही काहीही होऊ शकते.
सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणाबाबत शेख हसीना सरकारच्या भूमिकेविरोधात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशाची राजधानी ढाका, बोगरा, पबना, रंगपूर, मगुरा, कोमिला, बरिसाल आणि फेनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून बांगलादेशात जाऊ नये असे आवाहन भारत सरकारने केले आहे. दरम्यान, वाढत्या हिंसचाराच्या पार्श्वभूमीवर देशात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट देखील बंद करण्यात आले आहे. आंदोलकांना थोपवण्यासाठी लष्कर रस्त्यावर उतरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशात सुरू असलेल्या हिंसचारांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे. सध्या त्या सुरक्षित पण अज्ञात स्थळी रवाना झाल्या. शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं देश सोडला असून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे, असे काहींचे म्हणणे आहे.
शनिवारी बांगलादेशच्या पंतप्रधानांनी चळवळीच्या समन्वयकांसोबत बसण्याची तयारी दर्शवली. मात्र, हसीना यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत बोलावलेल्या तातडीच्या बैठकीनंतर आंदोलकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला पंतप्रधानांचा प्रस्ताव विद्यार्थी आंदोलकांनी फेटाळून लावला आणि सरकारच्या राजीनाम्याची एकजूट केली. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे.
बांगलादेशात जुलै महिन्यापासून आरक्षण विरोधात आंदोलन सुरू होते. सुरवातीला या आंदोलनात विद्यार्थी उतरले होते. दरम्यान, त्यांच्या मागणीनुसार बांग्लादेशच्या कोर्टाने सर्व आरक्षण रद्द केले होते. मात्र असे असतांनाही आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन आणखी हिंसक झाले आहे. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
बांगलादेशातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्याच्या निवासस्थानावर आंदोलकांनी हल्ला केला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. काही रिपोर्ट्समध्ये शेख हासिना या भारताला रवाना होत असल्याचं सांगण्यात आलं आहे, तर त्यांच्या जवळच्या सूत्रांनी पंतप्रधानांबद्दल कोणतीही बातमी नसल्याचे सांगितले आहे. स्थानिक वृत्तपत्र प्रथमो डेलीने लिहिले आहे की शेख हसीना त्यांची धाकटी बहीण रेहानासोबत एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांनी देश सोडला आहे. आज दुपारी ३ वाजता त्यांनी त्यांचे निवास्थान सोडले. डेली स्टारनेही याबाबत अहवाल दिला आहे. दरम्यान, हजारो आंदोलक विद्यार्थ्यांनी ढाकापर्यंत मोर्चा काढला आहे. आता हे लोक राजधानीत पोहोचले आहेत. ढाका येथे आधीच मोठ्या संख्येने लोक जमले आहेत.
लष्करप्रमुखांनी पाक एजन्सी आयएसआयला धरले जबाबदार
बांगलादेच्या लष्कराचे जनरल वकार-उझ-झमान यांनी आपल्या देशाला संबोधित केलेल्या भाषणात पाकिस्तानी एजन्सी आयएसआयला जबाबदार धरले आहे. बांगलादेशातील हा संपूर्ण वाद १९७१ च्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या कुटुंबीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि प्रवेशाला विरोध करण्यापासून सुरू झाला. या हिंसाचारात आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेख हसीना सरकारने आंदोलन चिरडण्यासाठी लष्कर तैनात केले होते, ज्यामुळे वाद आणखी वाढला. हसीना भारत समर्थक मानल्या जातात.
लष्करप्रमुख वकार-उझ-जमान म्हणाले की, सत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे. अंतरिम सरकार स्थापन होईल. देशात हिंसचारा दरम्यान झालेल्या सर्व हात्यांची चौकशी केली जाईल. जनतेला लष्करावर विश्वास ठेवावा लागेल. यासोबतच त्यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.