बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हिंसाचार टोकाला पोहोचला आहे. पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही आंदोलक आक्रमक झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानासह पक्षाच्या संबंधित स्थानांवर हल्ले केले. हसिना यांच्या घरातील कपड्यांसह अनेक वस्तू लांबवल्या. देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनीअल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.जमावाकडून हिंदूना लक्ष्य केले जात आहे. अनेकांनी घरे जाळण्यात आली असून दुकानांमध्ये लुटपाट केली जात आहे. हिंदूंवर गोळ्या घालून त्यांना वेचून ठार केले जात आहे. मेहरपूर येथील इस्कॉन मंदिर तसेच काळीमाता मंदिरातही तोडफोड करून मंदिराला आग लावली आहे.
बांगलादेशात रविवारी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये रंगपूर सिटी कॉर्पोरेशनचे हिंदू नगरसेवक हरधन रॉय हारा यांच्यासह १०० जणांचा मृत्यू झाला. इस्कॉन आणि काली मंदिरांसह हिंदूंची घरे आणि मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याने भाविकांना अन्य ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.
हरधन रॉय हे परशुराम ठाणे अवामी लीगचे आणि रंगपूर शहरातील प्रभाग चारचे नगरसेवक होते. दरम्यान, रविवारी झालेल्या हिंसक आंदोलनात रंगपूरच्या हिंदू नगरसेविका काजल रॉय यांचाही मृत्यू झाल्याची माहिती 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिली आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो बांगलादेशी आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर सरकारच्या समर्थकांवर हल्ले केले. रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली असून ती सुरूच राहणार आहे. सरकारने बँकांसह सर्व आस्थापना तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र, रुग्णालये, पाणी, गॅस आणि वीज यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
बांगलादेशातील सरकारविरोधी निदर्शनांतील रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशातील संघर्षातील मृतांची एकूण संख्या किमान ३०० वर पोहोचली आहे. पोलिस, अधिकारी आणि रुग्णालयातील डॉक्टरांच्या अहवालाच्या आधारे ही आकडेवारी तयार करण्यात आली आहे. राजधानी ढाक्यात जवान आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा प्रमुख रस्त्यांवर गस्त घालत असून पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
बांगलादेशातील हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशात न जाण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशात वास्तव्यास असलेल्या आपल्या नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचा आणि त्यांच्या हालचाली मर्यादित ठेवण्याचा सक्त इशारा दिलाआहे. सध्याच्या घडामोडी लक्षात घेता, भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशात न जाण्याचा सक्त सल्ला देण्यात आला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे.