Bangladesh Fire : बांगलादेशची राजधानी ढाक्यामध्ये गुरुवारी रात्री भीषण दुर्घटना घडली आहे. येथील एका ७ मजली इमारतीला भीषण आग लागली असून या आगीत ४३ जण जळून ठार झाले तर २२ जन गंभीर जखमी झाले. सुरवातीला या इमारतीत असलेल्या हॉटेलमध्ये आग लागली. त्यानंतर संपूर्ण इमारतीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. बांग्लादेशचे आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे,
बांगलादेशची राजधानी ढाका येथील सात मजली इमारतीत गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका हॉटेल मध्ये सुरुवातीला ही आग लागली. त्यानंतर काही क्षणात आगीने भीषण रूप धारण केले. ही आग दुसऱ्या मजल्यावर पोहचली. येथे असलेल्या एका कापडाच्या दुकानाला या आगीने वेढा दिला. पाहता पाहता आग मोठ्या प्रमाणात भडकली. दरम्यान, काही नागरिकांनी तातडीने इमारती बाहेर पळ काढला. तर जे बाहेर पडू शकले नाही त्यांचा जळून मृत्यू झाला. या घटनेत आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२ जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या आगीमुळे इमारतीत ७५ नागरिक अडकले होते, त्यापैकी ४२ बेशुद्ध झाले होते. या लोकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. असून त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
याबाबत बांगलादेशचे आरोग्य मंत्री डॉ सामंत लाल सेन म्हणाले की, ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ३३ नागरिकांचा मृत्यू झाला, तर शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न आणि प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटलमध्ये १० नागरिकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सध्या दोन्ही रुग्णालयांत २२ जखमी नागरिकांवर उपचार सुर असून त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीत जळलेल्या काही जणांची ओळख पटवणे देखील कठीण झाले आहे.