Bangladesh Crisis : बांगलादेशातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे भारताची चिंताही वाढली आहे. बांगलादेशातील जेलमध्ये असलेले अनेक दहशतवाद्यांनी पळ काढल्याची माहिती आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर आहेत. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश भारताचा चांगला मित्र होता. दोन्ही देशातील तब्बल ४ हजार किमीच्या सीमारेषेबाबतही भारत निश्चिंत होता. मात्र, आता परिस्थिती बदललेली आहे. शेख हसीना बांगलादेश सोडून गेल्यानंतर परिस्थिती पूर्वीसारखी राहणार नसल्यानं भारताचं टेंशन वाढणार आहे. पाकिस्तान आणि भारतविरोधी शक्तींशी संबंधित काही संघटना सरकारमध्ये सामील झाल्याचं देखील बोललं जात आहे.
बांगलादेशात लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. तेथील लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या अंतरिम सरकारमध्ये शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगचा समावेश होणार नसल्याचे वृत्त आहे. बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए-इस्लामी हे दोन पक्ष सरकारमध्ये सामील होणार आहेत. हे दोघेही भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याची एकही संधी सोडत नाहीत. जमात-ए-इस्लामीचे पाकिस्तानशी असलेले संबंध सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर बांगलादेश नॅशनल पार्टीने भारताविरुद्ध जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा विरोधी गोष्टी केल्या आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधान असताना भारतविरोधी शक्तींवर जरब बसवला होता. पण, आता परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही. भारतविरोधी शक्ती बांगलादेशच्या भूमीचा वापर करून भारत विरोधी दहशतवादी कारवायांसाठी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा सुमारे ४ हजार किमी लांब आहे. जोपर्यंत शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या, तोपर्यंत भारत सीमेच्या सुरक्षेबाबत निश्चिंत होता. यावेळी त्यांनी देशातील विकास आणि आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केले. मात्र परिस्थिती बदलल्यानंतर आता सीमेबाबत खबरदारी वाढवावी लागणार आहे. विशेषत: ड्रग्ज, मानवी तस्करी आणि बनावट चलनाचा धोका येत्या काळात वाढणार आहे.
बांगलादेशशी संरक्षण सहकार्य भविष्यात कसे असेल याचीही भारताला काळजी राहणार आहे. दहशतवादाला आळा घालण्याच्या प्रयत्नांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या याआधी झालेल्या बैठकांमध्ये दहशतवादाला आळा घालण्यासाठी संयुक्त प्रयत्नांवर भर देण्यात आला होता. याशिवाय बांगलादेश सशस्त्र दलाच्या आधुनिकीकरणासाठी संरक्षण औद्योगिक सहकार्यावरही चर्चा झाली होती. पण नवीन सरकार आल्यावर परिस्थिती कशी बदलते हे पाहणे बाकी आहे.
शेख हसीना यांच्या काळातही बांगलादेश आणि चीनचे संबंध बरेच चांगले झाले आहेत. मात्र, चीनसोबतच्या कोणत्याही कराराचा भारतासोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ नये, अशी काळजी देखील त्यांनी घेतली होती. तिस्ता विकास प्रकल्पात चीनला रस असूनही तो भारताने सुरू करावा, असा शेख हसिना यांचा आग्रह होता. पंतप्रधान मोदींसोबतच्या शेवटच्या भेटीत भारताने तिथे एक तांत्रिक टीम पाठवण्याचे मान्य केले होते. बांगलादेशात भारतविरोधी शक्ती वाढल्याने चीनला आता तेथे आपला प्रभाव वाढवने शक्य होणार आहे. तेथे स्वतःला मजबूत करणे सोपे होऊ शकते. अशा परिस्थितीत नवे सरकार या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत काय भूमिका घेणार या कडे भारताचे लक्ष लागून राहिले आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संरक्षण आणि लष्करी सहकार्य यावेळी बरेच चांगले होते. मात्र शेख हसीना देशातून पळून गेल्यानंतर अनेक गोष्टी आता रेंगाळणार आहेत. बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार उझ झमान येत्या काही दिवसांत भारत दौऱ्यावर येणार होते. महिन्याभरापूर्वी बांगलादेशने भारतीय संरक्षण शिपयार्डशी करार केला होता. यासाठी मोठी रक्कम खर्च करायची होती, पण बांगलादेशात ज्या प्रकारे परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे भारत आता वेट अँड वॉचची भूमिकेत असणार आहे.