Viral news of Banana Sold for 52 Crore : जगभरात वेगवेगळ्या कलाकृती या कोट्यवधी रुपयांना विकल्या जातात. या कलाकृतींची पारख असणारे अनेक दर्दी जणकार आहेत. या कलाकृती श्रीमंत लोक आपलं घरं, कार्यालय सुशोभित करण्यासाठी विकत घेतात. प्रामुख्याने या वस्तुंचा लिलाव केला जातो. यातून या वस्तुंची खरेदी-विक्री केली जाते. सध्या अशाच एका अनोख्या कलाकृतीच्या लिलावाची जोरदार चर्चा होतेय.
सुप्रसिद्ध इटालीयन कलाकार मॉरिझियो कॅट्टेलान यांनी ‘भिंतीवर डक टेपने लटकवलेले केळी’ या कलाकृतीचा लिलाव केला. या कलाकृतीमध्ये असलेले केळ हे तब्बल ५२ कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. मात्र, हे केळ भिंतीवर न लावता विकत घेणाऱ्याने खाऊन टाकले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
सार्वजनिकरित्या आयोजित करण्यात आलेल्या सोथेबीज लिलावामध्ये भिंतीवर डकटेपने चिकटवलेली केळी या कलाकृती खरेदी करण्यासाठी ६.३ दशलक्ष डॉलर म्हणजेच ५२.३५ कोटी रुपयांची बोली लागली. या वादग्रस्त कलाकृतीचे नाव ‘कॉमेडियन’ असे असून, या लिलावानंतर तिची संपूर्ण जगभरात चर्चा झाली. ज्या व्यक्तीने ही कलाकृती विकत घेतली त्याने हे केळ खाऊन टाकले. चीनमध्ये जन्मलेले क्रिप्टोकरन्सी व्यापारी जस्टिन सन यांनी ही कलाकृती खरेदी केली होती. हाँगकाँगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सन यांनी हे केळ टेप काढून खाऊन टाकले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सन यांचा ५२ कोटी रुपयांचे केळं खातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सन म्हणतात, हे केळी खरंतर इतर केळीपेक्षा जास्त चविष्ट आहे. केळीची ही वैचारिक कलाकृती मॉरिझिओ कॅटलान यांनी तयार केली असून केळी विकत घेतल्याचा अभिमान आहे. मॉरिझिओ कॅट्टेलान यांची प्रतिष्ठित कलाकृती कॉमेडियन मी तब्बल ६.२ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केली आहे. ही फक्त एक कलाकृती नाही तर एक सांस्कृतिक घटना आहे, असे सन म्हणाले. मला विश्वास आहे की ही कलाकृती भविष्यात आणखी विचारांना आणि चर्चांना प्रोत्साहन देईल. या केळीचा मालक असणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे येत्या काही दिवसांत, कलेचा इतिहास आणि पॉप्युलर कल्चर या दोन्हींमध्ये या कलाकृतीचं जे स्थान आहे त्याच्या सन्मानार्थ एक अनोखा कलात्मक अनुभव म्हणून मी स्वत: हे केळ खाल्ले असे सन म्हणाले.
जस्टिन सनने यांनी हा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांना या केळीची चव कशी होती? असे विचारले आहे. हा व्हिडिओ ५ ,०८,००० हून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मी माझी तीन युआन केळी खाल्ली. खायला खूप चविष्ट होती. दुसऱ्याने लिहिले की, "तुम्ही स्वत: ते खायला नको होते, तर त्याचे तुकडे करून किमान १०० लोकांना वाटायला हवे होते."
ही कलाकृती २०१९ मध्ये पेरोटिन गॅलरीने आर्ट बेसल मियामी बीचवर प्रथम प्रदर्शित केली होती. कलाकार मॉरिझिओ कॅटेलन यांनी सुरुवातीला मियामीच्या किराणा दुकानात सुमारे ३० सेंटला ते विकत घेतले होते.
संबंधित बातम्या