तेलंगणातील बाळापूर गणेश मंदिरातील प्रसिद्ध असलेली लाडूच्या लिलावात मंगळवारी ३०.१ लाख रुपयांची विक्रमी बोली लावली गेली. हा लिलाव येथील गणेश उत्सवाचे एक प्रमुख आकर्षण आहे. दरवर्षी बाळापूर गणेश मूर्ती हुसेनसागर तलावात विसर्जनासाठी निघताना याचा लिलाव होतो. यावर्षी या लाडूसाठी सर्वाधिक बोली भाजप नेते कोलानू शंकर रेड्डी यांनी लावली. ही बोली गेल्या ३० वर्षातील आतापर्यंतची सर्वोच्च बोली आहे. २१ किलो वजनाचा प्रसिद्ध लाडू कोलानू शंकर रेड्डी यांनी लिलावात जिंकला आहे. ही रक्कम बालापूर गणेश उत्सव समिती ( Balapur Ganesh Utsav Samiti) (बीजीयूएस) ला जाग्यावरच देण्यात आली.
यावर्षी लाडूला मिळालेली रक्कम गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये मिळालेल्या रक्कमेहून ३ लाख रुपये अधिक आहे. गेल्या वर्षी दयानंद रेड्डी यांनी २७ लाख रुपयात लाडू खरेदी केला होता. एकूण चार लोकांनी लाडूच्या लिलावात सहभाग घेण्यासाठी नोंदणी केली होती. यामध्ये अनेक जण बाहेरून आलेले होते. त्यांनी २७ लाख रुपयांची अनामत रक्कमही भरली होती.
शहराच्या इतर भागातील विविध गणेश मंदिरांमध्येही अशाच प्रकारचे लिलाव झाले. बाळापूरच्या लाडू लिलावात अनेक नामवंत राजकारणी आणि व्यावसायिक सहभागी झाले होते. २०२३ साली बाळापूरच्या लाडूचा लिलाव २७ लाख रुपयांना झाला होता. दरम्यान, रंगारेड्डी जिल्ह्यातील बंडलागुडा नगरपालिका हद्दीतील कीर्ती रिचमंड व्हिला येथे झालेल्या आणखी एका लाडू लिलावात गेल्या वर्षीच्या १.२६ कोटी रुपयांच्या किमतीपेक्षा ६७ लाख रुपयांची वाढ होऊन १.८७ कोटी रुपयांची बोली लागली.
लाडू लिलावाची ही परंपरा १९९४ पासून सुरू झाली. हा लाडू आपल्यासाठी भाग्यवान आहे, असे येथील स्थानिकांचे मत आहे. हे धन, समृद्धी आणि सौभाग्यासह चांगले आरोग्य प्रदान करते. दरवर्षी मूर्ती विसर्जनापूर्वी या लाडूचा लिलाव केला जातो. त्याचबरोबर त्यातून जो काही पैसा मिळतो, तो विकासकामांसाठी वापरला जातो.
भक्तांमध्ये बाळापूर गणेशाचे लाडू म्हणून ओळखले जाणारे हे दिव्य अर्पण शुद्ध तूप आणि सुक्या मेव्यापासून बनवले जाते आणि गणपतीच्या हस्ते चांदीच्या भांड्यात ठेवले जाते. बाळापूरचे लाडू हनीवेल फूड्सतर्फे दरवर्षी तयार करून दान केले जातात. लिलावातून मिळणाऱ्या रकमेचा वापर परिसरातील विकासकामांसाठी केला जातो. १९९४ साली पहिल्यांदा लाडू लिलाव आयोजित करण्यात आला होता.
२०१९ मध्ये हैदराबाद येथील कोलन रामी रेड्डी यांनी या लाडूसाठी तब्बल १७.६ लाख रुपयांची बोली लावली होती. कोलानू कुटुंब पिढ्यानपिढ्या बाळापूर लाडू लिलावाशी संबंधित आहे आणि २०१९ मध्ये त्यांनी चौथ्यांदा विजयी बोली लावली. रामी रेड्डी यांचे वडील कोलानू मोहन रेड्डी हे स्थानिक शेतकरी असून त्यांनी ४५० रुपयांना लाडू खरेदी करून पहिला लाडू लिलाव जिंकला होता. तेव्हापासून त्याने पाच वेळा लिलावात भाग घेतला आहे आणि जिंकला आहे, तर त्याच्या कुटुंबाने तीन वेळा विजयी बोली लावली आहे.
हैदराबाद आणि आसपासच्या परिसरातील अनेक पूजा समित्यांकडून लाडू लिलावाचे आयोजन केले जाते. या लिलावामुळे विजेत्याला समृद्धी मिळते आणि हा लिलाव अत्यंत शुभ मानला जातो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
बाळापूर हैदराबादच्या दक्षिण किनाऱ्यावर आहे. त्याचप्रमाणे हैदराबादमधील खैरताबादची गणेश पूजाही प्रसिद्ध आहे. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. देशातील सर्वात उंच पुतळा येथे स्थापित असल्याचे सांगितले जाते.