Dhirendra Shastri Controversial Statement On Sant Saibaba : संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे बागेश्वर धामचे हिरेंद्र शास्त्री यांनी आता शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही, पूजा करायचीच असेल तर हिंदू धर्मात संत कमी आहेत का?, असा सवाल करत हितेंद्र शास्त्री यांनी साईबाबांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिर्डीतील साईबाबा यांच्यावर महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं आता हितेंद्र शास्त्री यांच्या साईबाबांवरील वक्तव्यामुळं संताप व्यक्त केला जात आहे.
मध्यप्रदेशातील जबलपूर येथील कार्यक्रमात बोलताना बागेश्वर धामचे हितेंद्र शास्त्री म्हणाले की, हिंदू धर्माचे शंकराचार्य यांनी साईबाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. त्यामुळं आपल्याला शंकराचार्यांचं मत मानणं गरजेचं आहे. याशिवाय त्यांच्या मतांचं पालन करणं हे प्रत्येक सनातनी व्यक्तीनं कर्तव्यच समजायला हवं. सनातनी धर्माचे शंकराचार्य हे पंतप्रधान आहेत. त्यामुळं कोणत्याही संतांना (साईबाबांना) ईश्वराचं स्थान देता येणार नाही, असं म्हणत हितेंद्र शास्त्री यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
साईबाबांबद्दल पुढे बोलताना हितेंद्र शास्त्री म्हणाले की, गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही, संतांची पूजा करायचीच असेल तर हिंदू धर्मामध्ये संत कमी आहेत का?, साईबाबा हे संत असू शकतात, फकिर असू शकतात. परंतु ते ईश्वर होऊ शकत नाही. कारण गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही, असं हितेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे. कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीयेत. काही लोक याला वादग्रस्त वक्तव्य म्हणतील, परंतु यावर बोलणं फार गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हितेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध..
बागेश्वर धामच्या हितेंद्र शास्त्री यांनी साईबाबांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निषेध केला आहे. निवडणुका आल्या की, भोंदूबाबांना पुढे करून वादग्रस्त विधानं करण्याचं काम भाजपतर्फे केलं जात आहे. जाती-धर्मात वाद लावून राजकीय पोळी भाजली जात आहे. वाढलेली बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार यावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठीच अशी विधानं केली जात असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.