मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘तुम्ही माझी साथ द्या मी तुम्हाला हिंदुराष्ट्र देतो’, धिरेंद्र महाराजांचं भक्तांना वादग्रस्त आवाहन

‘तुम्ही माझी साथ द्या मी तुम्हाला हिंदुराष्ट्र देतो’, धिरेंद्र महाराजांचं भक्तांना वादग्रस्त आवाहन

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 23, 2023 06:16 PM IST

bageshwar dham dhirendra shastri : दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या धिरेंद्र महाराजांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या घोषणेचा आधार घेत भक्तांसमोर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

dhirendra maharaj controversial statement
dhirendra maharaj controversial statement (HT)

dhirendra maharaj controversial statement : दिव्यशक्तीचा दावा करत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात चर्चेत आलेले बागेश्‍वर धामचे धीरेंद्र शास्‍त्री महाराजांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं चमत्कार करण्याचं खुलं आव्हान दिलं आहे. अंनिस आणि बागेश्वर धाममध्ये पेटलेल्या संघर्षानंतर आता श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिव्यशक्तीच्या दाव्यावरून वादंग पेटलेलं असतानाच आता धिरेंद्र महाराजांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद ओढवून घेतला आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भक्तांना संबोधित करताना तुम्ही माझी साथ द्या मी तुम्हाला हिंदुराष्ट्र देतो, असं वक्तव्य धिरेंद्र महाराजांनी केलं आहे. त्यामुळं आता त्यावरून पुन्हा नवं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

रायपूरमध्ये भक्तांना संबोधित करताना धिरेंद्र महाराज म्हणाले की, देशातील लोकांमध्ये राष्ट्रभावना असायला हवी. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो, अशी लोकप्रिय घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. परंतु आता तुम्ही मला साथ दिली तर मी तुम्हाला हिंदुराष्ट्र देईल, असं वक्तव्य धिरेंद्र महाराज यांनी केलं आहे. याशिवाय देशातील हिंदूंनी आता बांगड्या घालत बसू नये. सनातन धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं असून त्यामुळं सर्व हिंदूंना एकत्र होण्याची गरज असल्याचंही धिरेंद्र महाराज म्हणालेत. भारतात सनातन धर्माला टार्गेट केलं जात आहे. त्यामुळं आता भारत धर्मनिरपेक्ष नाही तर हिंदुराष्ट्र असल्याचं मी घोषित करतो. आता हिंदुंना कुणालाही घाबरण्याची गरज नाही. कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची हिंमत हिंदूंनी ठेवायला हवी कारण तयांच्या अंगात सनातन धर्माचं रक्त आहे, असंही धिरेंद्र महाराज म्हणाले.

देशातील अनेक भागांमध्ये कार्यक्रमांतून दिव्यशक्तीचा दावा करत अंधश्रद्धा पसरवण्याच्या आरोपाखाली धिरेंद्र महाराजांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा नागपुरातील कार्यक्रमही वादात सापडला आहे. सर्वांसमोर चमत्कार करून दाखवण्याचं अंनिसने दिलेलं आव्हान धिरेंद्र महाराज यांनी स्वीकारलं आहे. परंतु त्यासाठी श्याम मानव यांना बागेश्वर धाममध्ये येण्याची अट घातली आहे. परंतु श्याम मानव यांनी महाराष्ट्रात धिरेंद्र महाराजांनी चमत्कार करून दाखवल्यास त्यांच्या पाया पडून ३० लाख रुपये देणार असल्याचं खुलं आव्हान दिलं आहे.

IPL_Entry_Point