उत्तर प्रदेश राज्यातील बदायूं मध्ये घरात घुसून दोन मुलांची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपी साजिदचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. बरेली विभागाचे आयजी राकेश कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झाला.
बदायूंचे पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी माध्यमांना सांगितले की, पोलीस साजिदचा शोध घेत असताना त्याने पोलिसांना पाहून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गाळीबारात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडामागे तंत्र-मंत्र किंवा काळी जादूची शक्यता फेटाळली आहे. काही लोक ही हत्या तंत्र-मंत्र विद्येसाठी झाल्याचे म्हणत होते.
पोलिसांनी सांगितले की, दोन मुलांच्या हत्येत सामील असलेल्या दुसरा आरोपी व साजिदचा भाऊ जावेदचा पोलीस शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार साजिद शेजारी राहणाऱ्या विनोद नावाच्या व्यक्तीच्या घरात उधारी मागण्यासाठी गेला होता. तेथे त्याने दोन मुलांची हत्या केली. यानंतर संतप्त जमावाने त्याचे दुकाने जाळले.
पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, मात्र हत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की, साजिद आणि विनोद मध्ये असलेला वाद हत्येचे कारण असू शकते. विनोदने म्हटले आहे की, मुलांच्या हत्येचे कारण समजण्यासाठी जावेदला जिवंत पकडणे आवश्यक आहे. पोलिसांनी साजिदचे वडील व काका यांना ताब्यात घेतले आहे.
संबंधित बातम्या