NCERT Syllabus Change : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने अभ्यास क्रमात काही बदल केले आहेत. इयत्ता १२वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून बाबरी मशीद, हिंदुत्वाचे राजकारण, २००२ गुजरात दंगल आणि अल्पसंख्याकां संदर्भात असलेले काही प्रकरणे काढून टाकली आहेत. नव्या सत्रापासून बदललेला अभ्यासक्रम लागू होणार आहे. अलीकडच्या काळात एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच अभ्यासक्रमातील संवेदनशील विषय देखील काढून टाकण्यात आले आहेत.
एनसीईआरटीने या नव्या बदललेल्या अभ्यासक्रमाची माहिती वेबसाईटवर दिली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत सुमारे ३० हजार शाळांमध्ये एनसीईआरटीच्या पुस्तकातील अभ्यासक्रम शिकवला जातो.
एनसीईआरटीच्या राज्यशास्त्राच्या बारावीच्या पुस्तकातील आठव्या प्रकरणात अयोध्या विध्वंसाचा संदर्भ काढून टाकण्यात आला आहे. रामजन्मभूमी आंदोलन आणि अयोध्या विध्वंसाचे प्रकरण बदलून त्या ऐवजी रामजन्मभूमी आंदोलनाचा वारसा काय आहे?" असा बदल करण्यात आला आहे. या प्रकरणात बाबरी मशीद आणि हिंदुत्वाच्या राजकारणाचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे.
या बदलांवर एनसीईआरटीने म्हटले आहे की, अलीकडच्या काळात देशाच्या राजकारणात अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. यामुळे हा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात आला आहे.
या पुस्तकात गुजरात दंगलीचा विषय पाचव्या अध्यायातून काढून टाकण्यात आला आहे. या प्रकरणात आता असे म्हटले आहे की विविध क्षेत्रात मानवाधिकार उल्लंघनाची अनेक प्रकरणे संपूर्ण भारतातून लोकांच्या निदर्शनास येत आहेत. या व्यतिरिक्त. ज्या ठिकाणी मुस्लीम समाजाचा उल्लेख पूर्वी केला होता, त्या ठिकाणी देखील अभ्यास क्रमात बदल करण्यात आले आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात लोकसंख्येच्या १४.२ टक्के मुस्लीम आहेत आणि त्यांना भारतातील एक उपेक्षित समुदाय मानले जाते. याचे कारण ते इतर समुदायांच्या तुलनेत अनेक वर्षांपासून सामाजिक-आर्थिक लाभांपासून वंचित राहिले आहेत, असे म्हटले होते. यात बदल करण्यात आला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ११ वी आणि १२ वीच्या परीक्षेच्या स्वरुपात बदल केले आहे. ही नवी परीक्षा प्रणाली २०२४-२५ पासून लागू केली जाणार आहे. सीबीएसईने म्हटले आहे की ११ वी आणि १२ वीच्या परीक्षेच्या स्वरूपांतर्गत दीर्घ प्रश्न उत्तरांऐवजी, संकल्पनावर आधारित प्रश्न उत्तरावर आता लक्ष केंद्रित केले जाणार आहेत.