Azerbaijan plane crash : कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळले. देशाच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, विमानात ७० लोक होते आणि किमान ३० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मृतांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. अपघातापूर्वी वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली होती, अशी माहिती समोर आली आहे.
हे विमान हवेत असताना पक्ष्यांच्या थव्याला धडकले आणि त्यानंतर विमानाच्या ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला, असेही सांगितले जात आहे. फुटेजमध्ये दिसत आहे की, विमान उतरताच आगीच्या गोळ्यात रुपांतरित होते आणि विमानाचे तुकडे-तुकडे झाले.
अझरबैजान एअरलाइन्सचे J2-8243 क्रमांकाचे विमान कझाकस्तानच्या अक्तू शहराजवळ आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नात असताना आग लागली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान रशियाच्या ग्रोझनी शहराकडे जात होते पण धुक्यामुळे त्याने मार्ग बदलला. फुटेजमध्ये दिसत आहे की, लँडिंग गिअर खाली ठेवून विमान भरधाव वेगाने जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उतरताच त्याला आग लागली.
या विमानाचे अक्ताऊपासून तीन किलोमीटर अंतरावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटरडार २४ नुसार, या विमानाने अझरबैजानची राजधानी बाकू येथून बुधवारी जीएमटी ०३ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण केले आणि ०६ वाजून २८ मिनिटांनी क्रॅश झाले.
रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विमान कोसळण्यापूर्वी पक्ष्यांच्या कळपाला धडकले होते, परंतु अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. याशिवाय अपघातापूर्वी विमानाच्या ऑक्सिजन टँकमध्ये स्फोट झाला होता. संबंधित देशांच्या अधिकाऱ्यांनी विमानातील लोक आणि बचावलेल्यांची वेगवेगळी संख्या सांगितली आहे. प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत २५ जण बचावले असून त्यापैकी २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानात ६२ प्रवासी आणि ५ क्रू मेंबर्स होते, परंतु इतर अहवालांनुसार एकूण प्रवाशांची संख्या ७२ आहे. बचावलेल्यांची संख्या २५ ते ३२ च्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.
विमानातील बहुतांश प्रवासी अझरबैजानचे होते, मात्र रशिया, कझाकस्तान आणि किर्गिस्तानमधील काही प्रवासीही होते. अपुष्ट व्हिडिओ फुटेजमध्ये ढिगाऱ्याखालून बचावलेले लोक रेंगाळताना दिसत आहेत, त्यापैकी काहींच्या शरीरावर जखमादेखील दिसत आहेत. अझरबैजान आणि कझाकस्तान या दोन्ही देशांनी या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.
संबंधित बातम्या