ayushman bharat yojana : विविध आजार व शस्त्रक्रियांवर ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेत ७० वर्षांवरील वृद्धांचाही समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेविषयी नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. अनेक गोष्टींविषयी सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. नव्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर योजनेची योग्य माहिती घेणं औचित्याचं ठरेल.
एकाच कुटुंबातील किती लोक आयुष्मान कार्ड बनवू शकतात ही सर्वात महत्त्वाची शंका असते. त्यामुळं लोक योजनेपासून वंचित आहेत. खरंतर, एखादी योजना सुरू झाल्यावर तिच्या पात्रतेशी संबंधित निकष जारी केले जातात. कुटुंबनिहाय आयुष्मान कार्डच्या संख्येविषयी देखील यात स्पष्टता आहे. या सरकारी योजनेत गरजूंना सुविधा देण्यासाठी अशी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. याचा अर्थ, एकाच कुटुंबातील सर्व लोक आयुष्मान कार्ड बनवू शकतात, मात्र ते या योजनेसाठी पात्र असले पाहिजेत.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत बनवल्या जाणाऱ्या आयुष्मान कार्डांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ३० जून २०२४ पर्यंत आयुष्मान कार्डची संख्या ३४.७ कोटींहून अधिक झाली होती. या कालावधीत १ लाख कोटी रुपयांपर्यंतच्या ७.३७ कोटी आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेचे लाभार्थी देशभरातील २९ हजारहून अधिक रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात.
ग्रामीण भागात राहणारे, आदिवासी, अनुसूचित जाती किंवा जमातीचे निराधार किंवा अपंग किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारे किंवा रोजंदारी मजूर म्हणून उदरनिर्वाह करणारे सर्व लोक या योजनेसाठी पात्र आहेत. पात्रतेची माहिती ऑनलाइन देखील मिळवता येते.
pmjay.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवर 'मी पात्र आहे का' या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमचा १० अंकी मोबाईल नंबर सबमिट करावा लागेल.
तुम्हाला मोबाइलवर आलेला ओटीपी आवश्यक ठिकाणी टाका.
आता स्क्रीनवर तुमचं राज्य निवडा, त्यानंतर मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर टाका.
तुम्ही पात्र आहात की नाही याची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
अशा प्रकारे तुम्ही तुमचं आयुष्मान कार्ड बनवू शकता.
जर तुम्हाला या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही टोल फ्री क्रमांक १४५५५ वर कॉल करून तुमची पात्रता तपासू शकता. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुमच्या कागदपत्रांसह अर्ज करू शकता. अर्ज करताना आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशनकार्ड याशिवाय सक्रिय मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.