आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरुमला बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि फिश ऑईल मिसळल्याची बातमी समोर आल्यानंतर अयोध्येतील संत व महंत संतप्त झाले आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा तिरुपतीचे एक लाख लाडू पाहुण्यांना वाटण्यात आले होते. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तिरुपती बालाजी येथून तीन टन खास बनवलेले लाडू अयोध्येला आले होते. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रयोगशाळेच्या तपासणीत लाडूंमध्ये आढळलेल्या प्राण्यांची चरबी आणि फिश ऑईलच्या अहवालावर म्हटले आहे की, सरकारने याची गांभीर्याने चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा करावी.
आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, ही अत्यंत दु:खद गोष्ट असून कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेवर हा हल्ला आहे. सनातन धर्माला इजा पोहोचवण्याच्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा हा भाग असू शकतो, त्यामुळे सरकारने त्याची योग्य चौकशी करून यात परकीय षड्यंत्र आहे की देशातील जनतेचे काम आहे, याचा शोध घ्यावा. मुख्य पुजारी दास म्हणाले की, तिरुपती बालाजीच्या लाडूला खूप प्रसिद्धी आहे. ज्याने असे घृणित कृत्य केले आहे तो अतिशय भयानक गुन्हेगार आहे, देशद्रोही आहे. दास म्हणाले की, लाडूमध्ये हे सर्व कधीपासून मिसळले जात आहे, मला माहित नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी सरकारने घ्यावी, असेही ते म्हणाले.
जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरली जात असल्याचा खळबळजनकआरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आमदारांच्या बैठकीत केला होता. नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन गुजरातमधील प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला. गुजरातमधील आणंद येथील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या (एनडीडीबी) प्रयोगशाळेने तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाचे नमुने तपासले असता त्यात माशांच्या तेल तसेच जनावरांची चरबीचे अंश आढळल्याचे समोर आले आहे.
तिरुपती येथे १७७५ पासून प्रसाद म्हणून लाडू तयार केले जातात. २०१४ मध्ये तिरुपती लाडूलाही जीआय टॅग देखील मिळाला होता. आता या नावाखाली लाडू विकता येणार नाहीत. या लाडूंमध्ये मुबलक प्रमाणात साखर, काजू आणि मनुके असतात. एका लाडूचे वजन सुमारे १७५ ग्रॅम असते. तिरूपती बालाजी येथे दररोज सुमारे ३ लाख लाडू तयार केले जातात. मंडळाला एका वर्षात लाडूंपासून अंदाजे ५०० कोटी रुपये देवस्थानाला मिळतात.