अयोध्येमधील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली व देशातील कोट्यवधी हिंदुंचे स्वप्न पूर्ण झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये गोविंदगिरी महाराजांनी आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळताना त्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ज्याप्रमाणे श्रीमंत योगी असा केला होता. तसाच श्रीमंत योगी मोदींच्या रुपात आपल्याला राजनेता लाभला असल्याचं गोविंदगिरी महाराज म्हणाले.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींना चमच्याने चरणामृत पाजून त्यांचा उपवास सोडवला. गोविंदगिरी महाराज म्हणाले की, राम मंदिर ट्रस्टने मोदींनी ३ दिवसांचे अनुष्ठान सांगितलेलं असताना त्यांनी पूर्ण ११ दिवसांचं अनुष्ठान केलं. त्यांना तीन दिवस एकवेळचा उपवास करण्यास सांगितलं असताना मोदींनी ११ दिवसांचं उपोषण केलं. ११ दिवस त्यांनी अन्नाचा त्याग केला होता. असा तपस्वी राष्ट्रीय नेता प्राप्त होणे ही सामान्य बाब नाही. सांसर्गिक दोष येतात म्हणून आम्ही त्यांना परदेशात प्रवास न करण्याची सूचना दिली. त्यांनी काही देशांचा प्रवास टाळला. पण दिव्य देशांचा प्रवास करत नाशिकवरुन ते श्रीरंगमला व रामेश्वरमला गेले. संपूर्ण भारताच्या दिव्य ठिकाणी जाऊन जणू ते निमंत्रण देत होते की दिव्य आत्म्यांनो अयोध्येला या आणि आमच्या देशाला महान बनवण्यासाठी आशिर्वाद द्या.
आम्ही त्यांना ३ दिवस जमिनीवर झोपण्यास सांगितलं होतं. तुम्ही या थंडीत ११ दिवसांपासून जमिनीवर झोपत आहात. जो तप आम्ही तुमच्यात पाहिला. ही परंपरा पाहताना आम्हाला केवळ एक राजा आठवतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
गोविंदगिरी महाराज पुढं म्हणाले की, काही लोकांना कदाचित ठाऊक नसेल की, शिवाजी राजे जेव्हा मल्लिकार्जूनच्या दर्शनासाठी श्रीशैलमवर गेले तेव्हा ३ दिवसांचा उपवास केला. ३ दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी म्हटलं, मला राज्य नाही करायचं. मला संन्यास घ्यायचा आहे. मी शिवाच्या तपश्चर्येसाठी जन्मलो आहे. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत नेऊ नका. त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं आणि परत घेऊन आले की हे सुद्धा तुमचं कार्य आहे. आज आपल्याला तशाच प्रकारचे महापुरुष प्राप्त झाले आहेत. ज्यांना माता जगदंबेने हिमालयातून जा भारत मातेची सेवा कर म्हणत परत पाठवलं आहे. तुम्हाला भारत मातेची सेवा करायची आहे, असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.
संबंधित बातम्या