Dry Day in Assam : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचं वातावरण असून भाजपशासित राज्यांतील सरकारे वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. आसाम सरकारनं २२ जानेवारी रोजी ड्राय डे जाहीर केला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी X वरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. 'आसाम मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत श्री राम लल्ला विराजमान यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं २२ जानेवारी रोजी ड्राय डे असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
राम मंदिराचा उद्घाटन सोहळ्या संस्मरणीय करण्याची संपूर्ण तयारी भाजप व भाजपशासित सरकारांनी केली आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहे. महाराष्ट्रात एका आमदारानं २२ जानेवारी रोजी मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याबाबत महाराष्ट्र सरकारनं काहीही निर्णय घेतला नसला तरी आसाममध्ये दारूबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
अयोध्येतील सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए शासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री आणि ६ हजारहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे मुख्य विधी पार पाडतील. १४ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत अयोध्येत अमृत महाउत्सव साजरा केला जाईल.
१००८ हुंडी महायज्ञही आयोजित केला जाईल. यावेळी हजारो भाविकांना भोजन दिलं जाईल. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी २२ जानेवारी रोजी अयोध्येत येऊ इच्छिणाऱ्या हजारो भाविकांच्या सोयीसाठी अनेक टेंट सिटी उभारल्या जात आहेत.