अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी निवडक लोकांनानिमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का, या पाहुण्यांमध्ये छत्तीसगडमधील एक गरीब वृद्ध महिलाही सामील आहे, जी कचरा गोळा करून आपला उदरनिर्वाह करते. हे एकून तुम्हाला थोडे विचित्र वाटेल मात्र हे सत्य आहे. तर जाणून घेऊया असे का करण्यात आले आहे.
राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण आलेली भाग्यवान महिला छत्तीसगड राज्यातील गारियाबंद येथील रहिवासी आहे. या महिलेचे नाव बिदुला देवी असे आहे. तिचे जीवन खूपच संघर्षमय वातावरणात गेले असून वृद्धापकाळातही तिला पोटासाठी रस्त्यांवर भटकून कचरा गोळा करावा लागतो. प्रभू श्रीरामाच्या प्रति तिची आस्था आणि समर्पण पाहून तिला हे निमंत्रण मिळाले आहे.
ही गोष्ट २०२१ ची आहे, जेव्हा राम मंदिर निर्माणासाठी देशभरातून वर्गणी गोळा केली जात होती. विश्व हिंदू परिषदेचे नेते व कार्यकर्ते छत्तीसगड राज्यातील गारियाबंद येथील लोकांकडे वर्गणी मागायला गेले होते. त्यावेळी बिदुलाची नजर त्यांच्यावर पडली. या वृद्ध महिलेला समजले की, राममंदिरासाठी वर्गणी गोळा केली जात आहे. तिने त्या दिवशी कमाई झालेल्या ४० रुपयांपैकी २० रुपये मंदिरासाठी दान दिले होते.
गारियाबंदचे व्हीएचपीचे जिल्हा अध्यक्ष शिशुपाल सिंह राजपूत यांनी याला सर्वात छोटी मात्र सर्वात मोठी रक्कम म्हटले होते. त्यांनी ही कहानी एका बैठकीत विश्व हिंदु परिषदेच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितली होती. आता व्हीएचपीचे राज्य प्रमुख चंद्रशेखर वर्मा यांनी बिदुला यांना हे निमंत्रण पाठवले आहे. दुर्दैवाने बिदुला सध्या आजारी असून अयोध्येला जाण्यास असमर्थ आहे. तिने म्हटले की, बरी झाल्यावर ती रामलल्लाच्या दर्शनाला अवश्य जाईल.
संबंधित बातम्या