Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony : अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना वगळण्यात आलं आहे. त्यामागचं कारण आता समोर आलं आहे.
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यातील निमंत्रितांची एक यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार राम मंदिर ट्रस्ट राजकीय पक्षांचे अध्यक्ष, लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांचे नेते आणि १९८४ ते १९९२ या काळात राममंदिर आंदोलनाशी संबंधित असलेल्या लोकांना आमंत्रणं पाठवत आहे.
काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांना बोलावण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांना स्वतः राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी आमंत्रण दिलं आहे. सोनिया गांधी यांना काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) प्रमुख या नात्यानं राम मंदिर कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे, तर मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्ष म्हणून येणार आहेत.
प्रियांका गांधी या केवळ काँग्रेसच्या सरचिटणीस असल्यानं आणि राहुल गांधी हे केवळ केरळमधील वायनाडचे खासदार असल्यानं दोघांनाही निमंत्रित करण्यात आलेलं नाही. अधीर रंजन चौधरी हे लोकसभेतील काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी नुकतंच खर्गे यांना आमंत्रण दिलं. काँग्रेस पक्षाचे प्रमुख असण्यासोबतच ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेही आहेत.
'टाइम्स ऑफ इंडिया'नं राम मंदिर ट्रस्टच्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनाही आमंत्रण दिलं जाणार आहे. 'हा देवाचा कार्यक्रम आहे. देवापेक्षा मोठा कोणी नाही. ज्याला देव बोलावतो तो आपोआप धावत जातो, असं वक्तव्य अखिलेश यांनी नुकतंच केलं आहे. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या