Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिरातील मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन पोहचला आहे. दुपारी १२.२९ ला हा सोहळा सुरु होईल. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत ही पूजा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही पूजा केली जाणार आहे. आज श्रीराम मंदिरात विराजमान होणार आहेत. या निमित्त्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्यात फुलांची सजावट, रोषणाई करण्यात आली. तसेच रामायणाशी संबंधित विविध रांगोळ्या आणि चित्रे रेखाटण्यात येत आहेत. अशातच अयोध्येतील एका महाविद्यालयात चक्क दिव्यांपासून श्रीरामाची प्रतिमा साकारण्यात आली,ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये काही महिला मोठ्या मैदानावर दिवे लावताना दिसत आहेत. असंख्य दिव्यांच्या मदतीने ते प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला महिला फक्त दिवे पेटवत असल्याचे दिसेल. परंतु, व्हिडिओच्या शेवटी दिव्यांपासून श्री रामाची प्रतिमा तयार करण्यात आल्याचे दिसते. यासाठी अनेक रंगाचे दिवे लावण्यात आले. या प्रतिमेत श्रीराम धनुष्यबाण चालवताना दिसत आहेत. हे पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
Ayodyase या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'साकेत महाविद्यालय अयोध्या. १४ लाख दिव्यांपासून बनवली प्रभू श्रीरामाची प्रतिमा' असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे.
मंदिर न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत मंदिरात प्राणप्रतिष्ठेपूर्वीचे विविध विधी पार पडले. मंदिरासाठी देशभरातून कुंकू, अत्तर, विशाल घंटा, महाकाय कुलूप, १०८ फूट लांबीची अगरबत्ती, १ हजार ११० किलोचा दिवा, १ हजार २६५ किलोचा लाडू अशा विविध भेटवस्तू आल्या आहेत.