Ayodhya Rain : रामनगरी अयोध्या शहराची पहिल्याच पावसात मोठी वाताहत झाली आहे. शहरात जागो जागी पाणी साचले आहे. मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग देखील पाण्याखाली गेल्याने व वस्तीत पाणी शिरल्याने आयोद्धेच्या विकासाची पोलखोल झाली आहे. ऐवढेचं नाही तर राम मंदिराच्या गर्भगृहाला देखील पावसामुळे गळती लागल्याने विरोधकांनी अयोध्या विकासाचे ३० हजार कोटी गेले कुठे असा सवाल विचारला आहे.
अयोध्या राम नगरीत गेल्या दोन तीन दिवसांनपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे अयोध्या धामसह शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. जालवानपुरा परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. घरांमधील संसारोपयोगी साहित्य, बेड, फ्रीज, सोफा आदींचे नुकसान झाले आहे. हनुमानगढी चौकातही पाणी साचले होते. रस्ता खचल्याने आणि मोठमोठे खड्डे पडल्याने केवळ रामपथच नव्हे तर इतर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पहिल्या पावसानंतर अयोध्येतील रस्त्यांच्या बांधकामाच्या दर्जाची पोलखोल झाली आहे. रामपथ मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हे खड्डे वाळू आणि खडीने बुजवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अयोध्येतील रामघाट, कौसलेस कुंज, देवकाली रामपथ यासह बहुतांश भागात पाणी तुंबल्याने गटारांच्या लाईनही चोक झाल्या आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांचीच नव्हे तर आतील परिसरांचीही अवस्था हीच आहे. निराला नगर नवीन मंडई, अश्विनी पुरम, धनीराम पूर्वा परिसरात पावसामुळे पाणी साचले होते.
पहिल्या पावसानंतर आयोद्धेच्या विकास कामांची पोलखोल झाली आहे. अयोध्या विकासाठी सरकारणे तब्बल ३० हजार कोटी रुपये खर्च केले. राममंदिराच्या उद्घाटनावेळी येथील विकासाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, सहाच महिन्यात येथील विकासाची पोलखोल पावसाने केली आहे. मंदिरात जाणारा रामपथ दुरुस्त करण्याची प्रशासानची तयारी नव्हती. खड्डे बुजवण्यासाठी वाळू व गिट्टी वापरण्यात आली.
रिकबगंज रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. गिट्टी व वाळू टाकून खड्डे भरण्यात आले. या सर्व ठिकाणी पुन्हा झालेल्या पावसामुळे पुन्हा रस्त्यांची दुरवस्था झाली. याशिवाय रामपथवरील गुड्डी बाजार, साहबगंज पोलिस चौकी आणि उदया चौकाजवळील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील जुने भाजप कार्यालय आणि पोलिस लाईनजवळील रस्ताही पावसामुळे खचला आहे. अयोध्या धाममधील कोतवाली अयोध्येजवळील रस्ता सुमारे दोन फूट खचला आहे.
रीडगंज तिराहा येथे, पोलिस लाइन्समधील एसपी ग्रामीण निवासस्थानाजवळ, सिव्हिल लाइन्समधील रेल्वे स्टेशन मोड आणि एसएसपी निवासस्थानाजवळ, रामकोटमधील रंगमहल बॅरियरसमोर रस्ता खचला. या खड्ड्यात महापालिकेचे वाहन अडकले. व्हीआयपी पास असलेल्या भाविकांना रामललाचे दर्शन घेण्यासाठी रंगमहाल बॅरिअरमधून प्रवेश दिला जातो. रस्ता खचल्याने आणि पाणी साचल्याने भाविकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. जलकल संकुलही पावसाने तुडुंब भरले.
पावसामुळे श्री राम रुग्णालयाची भिंत कोसळली. त्यामुळे इमर्जन्सी, क्ष-किरण कक्ष, स्वयंपाकघरात पाणी पोहोचले. रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी वायपी सिंह यांनी सांगितले की, ही भिंत खूप जुनी होती. रुग्णालयातील इमर्जन्सी, एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड सेवा प्रभावित झाली. रुग्णांना जेवणही वेळेवर देता येत नव्हते.
जालवानपुरा येथील रहिवासी बिन्नू श्रीवास्तव यांनी सांगितले की, संपूर्ण घरात पाणी गेल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. विजेवर चालणाऱ्या वस्तु खराब झाल्या आहेत. काही नागरिकांनी घरच्या छतावर तर खाटांवर बसून रात्र काढली.
पावसामुळे बीएसए कार्यालयाच्या आत झाड पडले. तर ड्रेनेजअभावी मूलभूत शिक्षण संचालक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयासह अनेक कार्यालयांमध्ये पाणी शिरले आहेत. सिव्हिल लाईनमधली पोलीस लाईन अमृत सरोवरासारखी दिसू लागली. वीज विभागाच्या कार्यालयाचीही तीच अवस्था होती. अमणीगंज येथील वीज उपकेंद्रात पाणी साचले असून येथील ट्रान्सफॉर्मरही पाण्यात बुडाले.
संबंधित बातम्या