मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) आणि म्यानमारमधील लष्करात जोरदार चकमक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय लोकांसाठी मार्गदर्शन सूचना जारी केली आहे. यात परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सांगितले की, लोकांनी म्यानमारला प्रवास करणे टाळावे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, शेजारी राष्ट्र म्यानमारमधील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांना म्यानमारमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यातयेत आहे. याशिवाय जे लोक आधीच म्यानमारमध्ये राहत आहेत त्यांनी हिंसाचार प्रभावित भागात जाऊ नये. रस्ते मार्गे आंतरराज्य प्रवास देखील टाळावा.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरंदीम बागची यांनी ही सूचना ट्विट केली आहे. यात पुढे म्हटले आहे की, म्यानमारमध्ये राहणाऱ्या लोकांना भारतीय दूतावासात फॉर्म भरून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी पीडीएफने म्यानमारच्या चिन राज्यावर हल्ला केला होता. प्रत्युत्तर म्हणून म्यानमारच्या लष्कराने प्रत्युत्तर दिले.
मिझोराममध्ये पळून गेलेल्या म्यानमारच्या २९ सैनिकांना रविवारी १९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले. पीडीएफच्या लष्करी दलांनी छावण्या ताब्यात घेतल्यानंतर भारतात आलेल्या म्यानमार लष्कराच्या ७० जवानांना आतापर्यंत त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे. दरम्यान, सध्या भारत-म्यानमार सीमेवरील परिस्थिती शांततापूर्ण आहे.
पीडीएफने भारतीय सीमेजवळील म्यानमारच्या चीन राज्यातील खावमवी आणि रिखावदार या दोन लष्करी स्थानांवर हल्ला केला होता. त्यानंतर पीडीएफ आणि म्यानमारच्या सैन्यामुळे चकमक झाली. पीडीएफने हल्ला केल्यानंतर म्यानमारच्या लष्कराने प्रत्युत्तर देत खावमावी आणि रिहखावदार गावांवर हवाई हल्ले केले. यामध्ये एका ५१ वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला. याशिवाय या हल्ल्यात पीडीएफमधील सुमारे ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. मिझोरामचे ६ जिल्हे चंफई, सियाहा, लांगतलाई, सेरछिप, हनाथियाल आणि सैतुअल म्यानमारच्या चीन राज्याच्या सीमा रेषेला लागून आहेत..