Atul Subhash Mother Goes To Supreme Court: बेंगळुरू येथील एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या आईने आपल्या चार वर्षांच्या नातवासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अतुलच्या आईने आपल्या नातवाचा ताबा मिळावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अतुल यांच्या आईने सर्वोच्च न्यायलयात दाखल केलेल्या याचिकेवर ७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. अतुल सुभाष यांनी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत ९ डिसेंबर २०२४ रोजी आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल सुभाष यांची आई अंजू मोदी यांनी आपल्या नातवाचा ताबा मिळावा, यासाठी हेबस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. सुभाष यांची पत्नी निकिता किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने मुलाचा ठाव ठिकाणा सांगितला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. आपल्या नातवाची माहिती गोळा करण्यात सिंघानिया कुटुंब अडथळा आणत असल्याचा आरोप अंजू मोदी यांनी केला आहे. यासोबतच सुभाष यांचे वडील पवनकुमार यांनीही नातवाचा ताबा देण्याची अनेकदा मागणी केली आहे.
पोलीस चौकशीदरम्यान निकिताने सांगितले की, मुलगा फरिदाबादमधील एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत आहे, ज्याची देखभाल तिचे काका सुशील सिंघानिया करत आहेत. नातवाच्या कोठडीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता ७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटक सरकारला नोटीस बजावून परिस्थिती स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
नुकतीच बेंगळुरू पोलिसांनी निकिता सिंघानिया, तिची आई आणि तिच्या भावाला अटक केली. या तिघांना प्रयागराज आणि गुरुग्राम येथून अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस या तिघांची सातत्याने चौकशी करत आहेत. दरम्यान, अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुशील सिंघानियाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया यांच्यासह इतर आरोपींना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील हॉटेल रामेश्वरमजवळून अटक करण्यात आली. डीसीपी कुमार यांनी सांगितले की, आरोपी निकिता सिंघानियाला गुरुग्राममधील ब्लॉसम स्टेज पीजीजवळून अटक करण्यात आली. त्यांना बेंगळुरूला आणून न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एका खासगी कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर अतुल सुभाष (वय, ३४) यांनी ९ डिसेंबर रोजी बंगळुरू येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. आत्महत्याआधी त्यांनी २४ पानांची सुसाईड नोट लिहिली, ज्यात त्यांची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांकडून त्यांचा छळ होत असल्याचा आरोप केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
संबंधित बातम्या