Delhi CM : अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमी पक्षानं सुरू केलेला नव्या चेहऱ्याचा शोध अखेर संपला आहे. दिल्ली सरकारमधील विद्यमान मंत्री आतिशी त्यांची जागा घेणार आहेत.
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. 'आप'च्या आमदारांनी उभे राहून त्यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळ्यात सीबीआय व ईडीनं अरविंद केजरीवाल यांना आरोपी ठरवून तुरुंगात टाकलं होतं. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर ते पुन्हा राज्याचा कारभार हाती घेतील अशी अपेक्षा होती. मात्र, केजरीवालांनी सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. दिल्लीची जनता जोपर्यंत पुन्हा निवडून देत नाही व आम्ही स्वच्छ असल्याचं ठरवत नाही तोपर्यंत मुख्यमंत्रीपदी बसणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याचा शोध सुरू झाला होता.
मुख्यमंत्रिपदासाठी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांच्यापासून अनेक नावं चर्चेत होती. मात्र, आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. केजरीवाल व सिसोदिया यांच्या अनुपस्थितीत आतिशी यांनीच दिल्ली सरकारचा कारभार पाहिला होता. शिक्षण, अर्थ, महसूल, कायदा अशी अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडं होती. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत केंद्र सरकारच्या हल्ल्यांना त्यांनी समर्थपणे तोंड दिलं होतं. त्यामुळं केजरीवाल यांनी आतिशी यांच्यावर विश्वास टाकल्याचं बोललं जातं.
अरविंद केजरीवाल हे आज दुपारी उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार आहेत. त्याआधी आम आदमी पक्षाच्या विधीमंडळाच्या नेत्या म्हणून आतिशी यांची निवड झाली आहे.