Atishi will take oath today : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी आज २१ सप्टेंबर रोजी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच ५ मंत्र्यांच्या नियुक्तीलाही मान्यता दिली. आज दिल्लीतील राज निवास येथे आतिशी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शनिवारी दुपारी किंवा संध्याकाळी शपथविधी सोहळा होईल.
आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा शपथविधी सोहळा होऊ शकतो. मात्र, आतिशी या मंत्रिमंडळासोबत शपथ घेणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
आतिशी यांना मुख्यमंत्रिपदावर नियुक्त करण्यास परवानगी देण्याबरोबरच राष्ट्रपतींनी ५ मंत्र्यांच्या नियुक्तीलाही परवानगी दिली आहे. आज होणाऱ्या शपथ विधी सोहळ्यात सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन आणि मुकेश अहलावत हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
केजरीवाल यांचा राजीनामा स्वीकारण्याबाबत राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, 'राष्ट्रपतींनी राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा तत्काळ स्वीकार केला आहे. मात्र, नवे मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत ते राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
आतिशी यांच्या शपथेबाबत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये असे लिहिले आहे की, 'राष्ट्रपती सुश्री आतिशी यांना शपथ दिल्याच्या तारखेपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.
यापूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आतिशी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी विराजमान करण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला होता.
केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आतिशी यांच्याकडे वित्त, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि शिक्षण यासारखे १३ प्रमुख विभाग होत्या. त्यांना अनेक खाती हाताळण्याचा अनुभव असल्याने आतिशी यांची केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदी निवड केली.
केजरीवाल मंत्रिमंडळात गोपाल राय हे पर्यावरण, विकास आणि सामान्य प्रशासन विभाग सांभाळत आहेत, तर सौरभ भारद्वाज आरोग्य, पर्यटन आणि शहरी विकास खात्यांचे मंत्री आहेत. कैलाश गेहलोत यांच्याकडे वाहतूक, गृह आणि महिला आणि बालविकास मंत्री आहेत, तर इम्रान हुसेन अन्न आणि पुरवठा मंत्री आहेत.
समाजकल्याण मंत्री राज कुमार आनंद यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर दिल्लीच्या सुलतानपूर माजरा येथील आमदार मुकेश अहलावत यांना संधी दिली जाणार आहे. आनंद यांनी एप्रिलमध्ये केजरीवाल सरकारचा राजीनामा दिला होता आणि 'आप'शी संबंध तोडले होते.
दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह एकूण सात सदस्य आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने नवीन मुख्यमंत्री आणि नवीन सदस्यांचा कार्यकाळ अल्प असेल.