
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शानदार कामगिरीमुळे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले पण मुख्यमंत्री आतिशी यांना विजय मिळवता आला. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधूडी यांचा ३,५२१ मतांनी पराभव केला. धक्कादायक बाब म्हणजे पक्ष पराभवाच्या दु:खात बुडालेला दिसत असतानाच आतिशी यांनी सायंकाळी भव्य रोड शोसारखी मिरवणूक काढली.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघातील 'आप'च्या उमेदवार आतिशी जेव्हा त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आतिशी यांनी आपल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या मतदारसंघात भव्य रोड शो केला. खुल्या वाहनातून आलेल्या आतिशी लोकांना अभिवादन करताना दिसल्या. त्याचवेळी ‘माई रंग दे बसंती चोला’ या गाण्यावर समर्थक आणि कार्यकर्ते नाचताना दिसले.
आतिशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका व्हिडिओ फुटेजमध्ये आतिशी जोरदार डान्स करताना दिसत आहे. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते निवडणुकीत पराभूत झाले होते.
दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी आणि माजी खासदार रमेश बिधूडी यांचा ३,५२१ मतांनी पराभव केला. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीत रमेश बिधूडी आघाडीवर होते. आतिशी यांनी २०१९ मध्ये पूर्व दिल्ली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पुढील वर्षी झालेल्या दिल्ली निवडणुकीत त्यांनी कालकाजीची जागा जिंकली.
संबंधित बातम्या
