कालकाजीच्या आमदार आतिशी यांची दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आम आदमी पक्षाने निवड केली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे २२ आमदार आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते, त्यात सर्वांनी आतिशी यांच्या नावाला संमती दिली. दिल्ली विधानसभेचे पहिले अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सत्ताधारी भाजप सरकारने मागील 'आप' सरकारच्या कामगिरीविरोधात प्रलंबित असलेला कॅगचा अहवाल सभागृहात मांडला जाईल, असे सांगितले आहे. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह 'आप'चे अनेक बडे नेतेही निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
कालकाजीच्या आमदार आतिशी म्हणाल्या की, "मला विधिमंडळ पक्षाची जबाबदारी दिल्याबद्दल मी 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची आभारी आहे. जनतेने आम्हाला विरोधी पक्षाची जबाबदारी दिली असून विरोधक किती मजबूत आहेत हे 'आप' दाखवून देईल. आतिशी यांना विरोधी पक्षनेता बनवण्याबाबत गोपाल राय म्हणाले की, आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने आतिशी यांना दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतिशी यांनी आव्हानात्मक काळात मुख्यमंत्री म्हणून दिल्लीच्या जनतेची सेवा केली आहे. निरोगी विरोधी पक्षाची जबाबदारी 'आप' घेईल.
आतिशी म्हणाल्या की, भाजपची नवीन कॅबिनेट बैठक झाली, पण महिलांना २५०० रुपये देण्याची योजना मंजूर झाली नाही. रेखा गुप्ता यांच्या सरकारकडून महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना २५०० रुपये मिळवून देऊ. आतिशी यांच्यासह सर्वच नेते या योजनेवरून सातत्याने दिल्लीतील भाजप सरकारला घेराव घालत आहेत.
दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. यावेळी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासमोर विरोध पक्षनेत्याही महिलाच असतील. दिल्ली विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या दोघांच्याही भूमिकेत महिला असतील. सभागृहात रेखा विरुद्ध आतिशी असा सामना रंगणार आहे. रेखा गुप्ता शालीमार बागमधून आमदार आहेत, तर आतिशी कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. आतिशी यांनी रमेश बिधूडी यांचा पराभव केला, तर रेखा गुप्ता यांनी 'आप'च्या आमदार बंदना कुमारी यांचा पराभव केला.
संबंधित बातम्या