uttarakhand almora accident : उत्तराखंडमधील अल्मोडा येथे आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. सुमारे ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली. गढवाल-रामनगर मार्गावर सॉल्टजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर १९ जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी एसडीआरएफ आणि पोलिसांची पथके रवाना झाली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी गौरीखालहून रामनगरकडे एक बस निघाली होती. बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी होते. सॉल्टच्या कूपेजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. आणि ही बस खोल दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्याने प्रवाशांनी मोठा आरडाओरडा केला. मात्र, जागेवरच ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला.
अपघाताच्या वेळी काही प्रवासी बाहेर पडले. जखमी प्रवाशांनी सकाळी नऊच्या सुमारास नियंत्रण कक्षाला या अपघाताची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी सांगितले की, सॉल्ट आणि राणीखेत येथून पथके घटनास्थळी पाठविण्यात आली आहेत. २० प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण पौडी-अल्मोडा सीमेजवळ आहे. हे ठिकाण रामनगरपासून जवळ आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दु:ख व्यक्त करताना म्हटले आहे की, अल्मोडा जिल्ह्यातील मरगुला येथे झालेल्या दुर्दैवी बस अपघातात जीवितहानी झाल्याची अत्यंत दु:खद बातमी मला मिळाली आहे. मदत व बचाव कार्य जलदगतीने करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी वेगाने काम करत आहेत. गरज भासल्यास गंभीर जखमी प्रवाशांना एअरलिफ्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. '