Abhishek Kar News: हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील आसाम सरकारने इंफ्लुएंसर अभिषेक करविरोधात निर्देश दिले आहेत. अभिषेकने आसाम राज्याबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाला अभिषेक करविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आसाम पोलिस प्रमुख जी पी सिंग यांनी दिली.
आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत हँडलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘रिया उप्रेती नावाच्या एका युट्यूब चॅनवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात अभिषेक कर नावाची व्यक्ती आसामच्या इतिहास आणि परंपरेबाबत चुकीची माहिती पसरवत आहे. त्या व्यक्तीविरोधात योग्य ती कारवाई केली जाऊ शकते.’
अभिषेक करने एका युट्यूब पॉडकास्टदरम्यान खळबळजनक दावे केले आहेत, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अभिषेक करने असे म्हटले आहे की, आसामच्या मायोंग गावातील महिलांमध्ये पुरुषांना बकऱ्या किंवा इतर प्राण्यांमध्ये रूपांतरित करण्याची आणि नंतर रात्री त्यांना परत माणसांमध्ये बदलून शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता आहे. एवढेच नव्हेतर त्याने केलेल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी गुगलवर सर्च करण्याचा त्यांनी सल्ला दिला.
अभिषेक कर याने केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डीजीपी जीपी सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडी या प्रकरणाची चौकशी करेल. तसेच आसामच्या इतिहास आणि परंपरांबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल कारवर कायदेशीर कारवाई करेल. ही घटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीच्या माहितीबद्दल वाढत्या चिंता अधोरेखित करते.
संबंधित बातम्या