Himanta Biswa Sarma comment on WC final match : विश्वचषक २०२३ मधील फायनल सामन्यात टीम इंडियाच्या झालेल्या पराभवावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केल्यानंतर आता भाजपकडूनही प्रत्युत्तर दिलं जाऊ लागलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी भारताच्या पराभवासाठी थेट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दोष दिला आहे.
पीटीआयनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी हा सामना खेळवण्यात आल्यामुळंच भारताचा पराभव झाला, असं सरमा यांनी म्हटलं आहे. 'भारत-ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना होण्याआधीपर्यंत आपण प्रत्येक सामना जिंकत होतो. फक्त फायनल हरलो. मी नंतर येऊन पाहिलं की हा कुठला दिवस आहे? आम्ही का हरलो? हिंदू असल्यामुळं मी तारीख पाहिली. तेव्हा कळलं की ज्या दिवशी सामना झाला, त्या दिवशी इंदिरा गांधी यांची जयंती होती, अशी आठवण सरमा यांनी दिली.
भारताचा पराभव झाल्यापासून विरोधी पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठरवून टार्गेट करत आहेत, असा आरोप सरमा यांनी केला. 'भविष्यात नेहरू-गांधी कुटुंबातील कुणाच्याही जयंतीच्या दिवशी क्रिकेटचा फायनल सामना न घेण्याची काळजी बीसीसीआयनं घ्यावी. बीसीसीआयनं तारीख नीट पाहावी. गांधी कुटुंबातील कुणाची जयंती, वाढदिवस वगैरे नाही ना हे पाहावं. नाहीतर भारत हरेल, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.
खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार महुआ मोइत्रा, दानिश अली व ममता बॅनर्जी यांनी भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली होती. राहुल गांधी यांनी तर नरेंद्र मोदी 'पनौती' आहेत, असं म्हटलं होतं. त्यावरून भाजपमध्ये अस्वस्थता होती. हिमंता सरमा यांनी आज थेट इंदिरा गांधी यांना दोष देत या अस्वस्थतेला वाचा फोडली.
पंतप्रधान मोदी यांना ‘पनौती’ व 'खिसेकापू' म्हटल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. राहुल यांच्या उत्तरानं निवडणूक आयोगाचं समाधान न झाल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या