मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Congress President: गांधी कुटुंबाचा विश्वासू मोहरा रिंगणात; गेहलोत लढवणार अध्यक्षपदाची निवडणूक

Congress President: गांधी कुटुंबाचा विश्वासू मोहरा रिंगणात; गेहलोत लढवणार अध्यक्षपदाची निवडणूक

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 23, 2022 01:21 PM IST

Congress President Election: अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचे सांगतानाच त्यांनी आपण राजस्थानचे मुख्यमंत्रीपदही सोडणार असल्याचं अशोक गेहलोत यांनी सांगितलं.

अशोक गेहलोत लढवणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक
अशोक गेहलोत लढवणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (फोटो - पीटीआय)

Congress President Election: काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. यासाठी आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे. तसंच आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला असल्याचंही अशोक गेहलोत यांनी सांगितलं. अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती. दरम्यान, आपण राहुल गांधींचे मन वळवण्याचे प्रयत्न करू असं ते म्हणत होते. मात्र आता राहुल गांधींनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

अशोक गेहलोत हे लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, ते राजस्थानचे मुख्यमंत्रीपदही सोडणार आहेत. एक व्यक्ती एक पद असं धोरणं काँग्रेसने अवलंबले असून त्यानुसार अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचे सांगतानाच त्यांनी आपण राजस्थानचे मुख्यमंत्रीपदही सोडणार असल्याचं सांगितलं.

अशोक गेहलोत यांनी म्हटलं की, "मी काँग्रेस अध्य़क्षपदाची निवडणूक लढवावी असा निर्णय झाला आहे. आता यासाठी अर्ज कधी करायचा हे लवकरच निश्चित होईल. देशातील सद्यस्थिती पाहता विरोधकांची बाजू भक्कम कऱण्यासाठी हे गरजेचं आहे."

राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी हे घेतली. मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांचे नाव आघाडीवर आहे. तर अशोक गेहलोत यांच्याशिवाय काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखी काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. त्यात शशी थरूर यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. मात्र अशोक गेहलोत हेच काँग्रेस अध्यक्षपदाचे दावेदार मानले जात आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी २४ सप्टेंबरला अशोक गेहलोत हे अर्ज दाखल करू शकतात. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली असून ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर अर्ज मागे घेण्यासाठी ८ ऑक्टोंबरपर्यंत मुदत असणार आहे. जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर १७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तसंच १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या