Ashok Gehlot: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची संधी मिळूनही मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसलेले व राजस्थान काँग्रेसमधील कलहास कारणीभूत ठरलेले अशोक गेहलोत अखेर नरमले आहेत. त्यांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची माफी मागत पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळं ते राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याची चिन्हे आहेत.
राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची धुरा वाहण्याची तयारी न दर्शवल्यामुळं गांधी कुटुंबीयांनी आपल्या मर्जीतील म्हणून अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी राजी केले होते. बऱ्याच मनधरणीनंतर ते राजी झाले खरे, मात्र निवडणूक होईपर्यंत मुख्यमंत्रीपद कायम राहावं असं त्यांचं मत होतं. ते मान्य न झाल्यानं त्यांच्या समर्थक मंत्री व आमदारांनी थेट बंडाचा झेंडा उगारला. आमदारांच्या नाराजीशी आपला संबंध नाही असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरा, मात्र सोनिया गांधी त्यांच्यावर नाराज झाल्या. अध्यक्षपदासाठी त्यांनी दिग्विजय सिंह यांचं नाव पुढं केलं. हायकमांड कठोर भूमिका घेत असल्याचं दिसताच गेहलोत दिल्लीत दाखल झाले. मात्र, काल त्यांना सोनियांनी भेट दिली नाही. आज अखेर त्यांची सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली.
भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. राजस्थानमध्ये झालेल्या प्रकाराबाबत आपण सोनिया गांधी यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं. 'गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसमध्ये मला मानसन्मान मिळत आहे. पक्षानं वेळोवेळी माझ्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापासून आजपर्यंत प्रत्येकानं माझ्यावर विश्वास टाकला. काँग्रेसच्या सरचिटणीस पदापासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास हा हायकमांडच्या आशीर्वादामुळंच झाला आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आता दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांच्यात टक्कर
अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गेहलोत यांनी माघार घेतल्यानंतर आता दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांच्यात टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यापैकी दिग्विजय सिंह यांना गांधी कुटुंबीयांचा पाठिंबा असल्याचं बोललं जातं. दिग्विजय सिंह आणि थरूर यांनी एकमेकांची भेटही घेतली आहे. त्यामुळं थरूर हे ऐनवेळी माघार घेण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या