Asaram Bapu Parol News : बलात्काराच्या आरोपाखाली गेल्या ११ वर्षांपासून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला अखेर दिलासा मिळाला आहे. उपचारांसाठी न्यायालयानं त्याला सात दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसारामवर महाराष्ट्रात उपचार होणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आसाराम पॅरोलसाठी प्रयत्नशील होता. त्यानं अनेकदा अर्ज केले होते. त्याच्या प्रकृतीची दखल घेऊन अखेर राजस्थान उच्च न्यायालयानं त्याचा पॅरोलचा अर्ज स्वीकारला आहे. आता त्याला स्वखर्चानं पोलीस संरक्षणात उपचार घ्यावे लागणार आहेत.
सुरतमधील आश्रम एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूरच्या POCSO न्यायालयानं दोषी ठरवून आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याआधी गुजरातमधील ट्रायल कोर्टानं २०१३ मध्ये आसाराम बलात्काराच्या अनेक गुन्ह्यांखाली दोषी ठरवलं होतं.
महाराष्ट्रात आयुर्वेदिक पद्धतीनं उपचारासाठी आसारामनं याआधीही पॅरोल अर्ज दाखल केला होता. यावेळी पुन्हा त्यानं वकिलामार्फत राजस्थान उच्च न्यायालयात उपचारासाठी पॅरोल अर्ज केला होता.
आसाराम २ सप्टेंबर २०१३ पासून तुरुंगात आहे. त्यानं तुरुंगातून बाहेर येण्यासाठी आणि जामीन मिळविण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु तो अयशस्वी झाला. अलीकडंच अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं, त्यामुळं त्याला जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आलं.
वैद्यकीय कारणास्तव शिक्षा स्थगित करावी अशी याचिका आसारामनं केली होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला राजस्थान उच्च न्यायालयानं त्याच्या याचिकेची दखल घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं त्याला पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश दिले होते.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग यालाही २१ दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे. एका वर्षात दुसऱ्यांदा त्याला ही सवलत मिळाली आहे. फर्लोच्या काळात राम रहीम उत्तर प्रदेशातील बागपत येथील त्याच्या आश्रमात राहणार आहे.
दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी रामरहीम सिंग यांना २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१७ पासून तो हरयाणाच्या रोहतक येथील सुनरिया तुरुंगात आहे. रामरहीमवर एक पत्रकाराच्या हत्येचाही गुन्हा आहे.