मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Asaduddin Owaisi: धडा शिकवल्याच्या अमित शहांच्या वक्तव्याला ओवेसींचं उत्तर; म्हणाले, लक्षात ठेवा…

Asaduddin Owaisi: धडा शिकवल्याच्या अमित शहांच्या वक्तव्याला ओवेसींचं उत्तर; म्हणाले, लक्षात ठेवा…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 26, 2022 03:53 PM IST

Asaduddin Owaisi vs Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या धडा शिकवल्याच्या वक्तव्यावर असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Amit Shah- Asaduddin Owaisi
Amit Shah- Asaduddin Owaisi

Asaduddin Owaisi vs Amit Shah: गुजरातमधील दंगलखोरांना २००२ मध्ये धडा शिकवल्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद निवडणूक प्रचारात उमटत आहेत. विरोधकांनी शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे तर, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शहा यांना थेट इशारा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

खेडा जिल्ह्यातील महुधा येथील एका प्रचारसभेत बोलताना अमित शहा यांनी २००२ च्या आधी काँग्रेसनं गुजरातमध्ये अनेक दंगली घडवल्याचा आरोप केला होता. मात्र, २००२ मध्ये आम्ही असा धडा शिकवला की त्यानंतर आजपर्यंत दंगल करण्याची कुणाची हिंमत झालेली नाही, असं शहा म्हणाले होते. त्यांच्या या धडा शिकवल्याच्या भाषेवर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

ओवेसी यांनी शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘२००२ मध्ये धडा शिकवल्याचं तुम्ही जे म्हणता तो धडा कोणता होता ते आता लोकांना कळलं आहे. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना सोडून देण्याचा… बिल्किस बानोच्या तीन वर्षांच्या मुलीच्या खुन्यांना सोडून देण्याचा… अहसान जाफरी यांना मारून टाकण्याचा… बेस्ट बेकरी कांड… असं बरंच काही होतं. यापैकी कुठला कुठला धडा आम्ही लक्षात ठेवायचा? असा सवाल ओवेसी यांनी केला. ‘धडा शिकवण्यात मोठेपण नाही. शांतता, सौहार्द तेव्हाच टिकतो जेव्हा पीडितांना न्याय मिळतो. पण सत्ता मिळाल्यानंतर लोक विसरून जातात. सत्तेच्या नशेत बोलतात. देशाचे गृहमंत्री धडा शिकवल्याच्या बाता मारत आहेत. कसला धडा शिकवला. संपूर्ण देशात तुमची बदनामी झाली, असं ओवेसी म्हणाले. 'सत्ता कधीच, कोणाची कायम राहत नसते हे देशाच्या गृहमंत्र्यांनी लक्षात ठेवावं,' असा इशारा ओवेसी यांनी दिला.

 

WhatsApp channel