Arvind Kejriwal Dares Narendra Modi : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राजकारण भलतंच तापलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांना खुलं आव्हान दिलं आहे. 'उद्या आम्ही तुमच्या पक्षाच्या मुख्यालयात येत आहे. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाका,' असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. केंद्रातील मोदी सरकारनं 'जेल का खेल' सुरू केला आहे. मोदी सरकार आम आदमी पक्षाच्या मागेच लागले आहेत. प्रत्येक नेत्याला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला तुरुंगात टाकलं, संजय सिंह यांना तुरुंगात टाकलं. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकलं. माझ्या पीएला जेलमध्ये टाकलं. नुकतंच लंडनहून आलेल्या राघव चढ्ढा यांनाही जेलमध्ये टाकण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे,' असं केजरीवाल यांनी सांगितलं.
'दिल्लीत आम्ही गरीब मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची सोय केली. चांगल्या शाळा बनवल्या. हे लोक ते करू शकत नाहीत. त्यांना हे सगळं थांबवायचं आहे. आम्ही मोहल्ला क्लिनिक सुरू केले. सरकारी दवाखाने बनवले. लोकांना मोफत औषधाची, उपचारांची सोय केली. भाजपचे लोक हे करू शकत नाहीत. हा आमचा दोष आहे. दिल्लीकरांना मोफत वीज दिली. वीज पुरवठा अखंड सुरू केला, हा आमचा दोष आहे. हे सगळं भाजपला नको आहे म्हणूनच ते आम्हाला तुरुंगात पाठवत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
पंतप्रधानांनी हा जेलचा खेळ सुरू केलाय. ठीक आहे. मी उद्या दुपारी १२ वाजता पक्षाच्या सगळ्या नेत्यांसोबत भाजपच्या मुख्यालयात जाणार आहोत. त्यांनी आम्हाला तुरुंगात टाकावं. सर्वांना एकाच वेळी तुरुंगात टाकावं. आम्हाला तुरुंगात टाकून आम आदमी पक्ष संपेल असं मोदींना वाटतं. पण तसं होणार नाही. त्यांनी प्रयत्न करून बघावा. आम आदमी पक्ष हा एक विचार आहे. तुम्ही आमच्या जितक्या नेत्यांना तुरुंगात टाकाल, त्याच्या शंभर पट नवीन नेते तयार होतील, असं केजरीवाल यांनी ठणकावून सांगितलं.
दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अंतरिम जामीन दिला आहे. केजरीवाल १ जूनपर्यंत अंतरिम जामिनावर बाहेर राहतील. सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २ जून रोजी केजरीवाल यांना पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे.
संबंधित बातम्या