Arvind Kejriwal to resign as Delhi's chief minister : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध केला तरच मी मुख्यमंत्रिपद स्वीकारेन, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. आम्ही आमचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जनतेचा कोर्टात जाऊ, असे देखील ते म्हणाले.
दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल १५६ दिवसांनंतर तिहार जेलच्या बाहेर आले. आमची ताकद वाढल्याचे देखील केजरीवाल म्हणाले होते. दरम्यान, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे अरविंद केजरीवाल काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज दिल्ली येथील एका सभेत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.
अरविंद केजरीवाल विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांमुळे आम्ही काम करू शकणार नाही, असे काही जणांना वाटत आहे. विरोधकांनी आमच्यावर निर्बंध लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मी आता जनतेच्या कोर्टात जाणार आहे. येत्या दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही... मी प्रत्येक घरात आणि रस्त्यावर जाऊन जनतेची भेट घेणार असून जनतेचा निकाल येईपर्यंत मुख्यमंत्र्यांची खुर्चीत बसणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल म्हणाले, मी प्रामाणिक आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. निवडून आल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार आहे. फेब्रुवारीमहिन्यात ही निवडणूक होणार आहे. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकांसोबत निवडणुका घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत पक्षातूनच दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री असेल. येत्या दोन-तीन दिवसांत आप आमदारांची बैठक होणार असून, त्यात पुढचा मुख्यमंत्री निश्चित करण्यात येईल.
भाजपवर टीका करताना केजरीवाल म्हणाले, भाजपला पक्ष तोडून सरकार स्थापन करायचे आहे. आमचे मनोबल त्यांना नष्ट करायचे होते, पण ते अपयशी ठरले. त्यांना माझे धाडस व मनोबल तोडायचे होते. पक्ष तोडणे, आमदार तोडणे, नेत्यांना तुरुंगात पाठविणे हा फॉर्म्युला भाजपने तयार केला आहे. केजरीवाल यांना तुरुंगात पाठवून दिल्लीत सरकार स्थापन करू, असे त्यांना वाटत होते. पण ते आमचा पक्ष तोडू शकले नाहीत.
तुरुंगात असतांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही, असा सवालही मला करण्यात आला. मात्र, देशाच्या लोकशाहीचे रक्षण करायचे होते, म्हणून मी राजीनामा दिला नाही. त्यांनी एक नवा फॉर्म्युला बनवला आहे, ज्या ठिकाणी भाजप निवडणुका हारतात त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना ते तुरुंगात पाठवतात आणि आपलं सरकार स्थापन करतात. खोट्या आरोपाखाली तुरुंगात पाठवल्यास राजीनामा देऊ नका, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांना केले आहे.