Kejriwal on Modi Adani Relation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अदानी हे नरेंद्र मोदी यांचे फक्त मित्रच नसून फंड मॅनेजर आहेत, असा खळबळजनक दावा केजरीवाल यांनी केला आहे. मोदी पंतप्रधान असेपर्यंत देश भ्रष्टाचारमुक्त होणार नाही. भाजपची सत्ता गेल्यानंतर या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात जावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर सरकारी तपास एजन्सीचा गैरवापर केल्याचाआरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, ईडीआणि सीबीआयसारख्या संस्था विरोधी पक्षांच्या नेत्यांना बंदूक दाखवून म्हणत आहेत की, भाजपात प्रवेश करणार की, तरुंगात चक्की पिसणार. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर कोणत्याही भष्ट्र नेत्याचे सर्व पाप धुतले जातात.
केजरीवाल म्हणाले की, देशात ईडी आणि सीबीआयने देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आज एकाच पक्षात आणून सोडले आहे. आज देशातील सर्व भ्रष्टाचारी लोक भाजपामध्ये आहेत. त्यामुळे ज्या दिवशी मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. त्यादिवशी खऱ्या अर्थान देश भ्रष्टाचारमुक्त होईल, कारण सगळे भ्रष्टाचारी एकाच ठिकाणी असल्यानं त्यांना तुरुंगात धाडण्याचं काम सोपं होईल, असा टोला केजरीवाल यांनी लगावला.
केजरीवाल म्हणाले की, ईडी, सीबीआयवाले धाडी टाकतात. माथ्यावर बंदुक ठेवतात आणि तुरुंगात जाणार की भाजपमध्ये असे विचारतात. मनिष सिसोदियांच्या माथ्यावरही बंदुक ठेवली आणि असंच विचारलं गेलं. मनिष यांनी तुरुंगात जाणं पत्करलं पण भाजपात जाणार नाही सांगितलं. सत्येंद्र जैन यांच्या बाबतीतही असंच केलं. पण हेमंत बिसवा शर्मा, नारायण राणे, मुकुल रॉय, सुवेंद्रू अधिकारी यांनी चोरी केली होती. घोटाळे केले होते त्यामुळे त्यांनी माथ्यावर बंदुक ठेवताच भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला", असं केजरीवाल म्हणाले.
आज मोदी पंतप्रधान आहेत. पण ते काही कायमस्वरुपी राहणार नाहीत. कधी ना कधी त्यांनाही जावंच लागेल. त्यादिवशी खऱ्या अर्थानं भारत भ्रष्टाचारमुक्त होईल.